एरंडोल (प्रतिनिधी) इंण्डेन गॅस टँकर व मालवाहू आयशर ट्रकने समोरासमोर धडक दिली. या धडकेत तीन जण जखमी झाले आहेत. यातील ट्रकचालकाची प्रकृती चिंताजनक आहे. ही घटना एरंडोल धुळे हायवेवरील पातरखेडे येथे घडली.
याबाबत अधिक माहिती अशी की, इंण्डेन गॅस टँकर व मालवाहू आयशर ट्रक या परस्पर विरूद्ध दिशेने जाणारी दोन्ही वाहने समोरासमोर धडकल्याने दोन्ही वाहनांच्या चालकांसह एका वाहनाचा क्लिनर जखमी झाला आहे. तर ट्रकचालकाची प्रकृती चिंताजनक आहे. ही घटना मंगळवारी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास पातरखेडे गावानजिक राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वर घडली. GJ-06AX7600 या क्रमांकाचा इंण्डेन गॅस टँकर पारोळ्याकडून येऊन जळगावच्या दिशेने जात होता. तर GJ-09Z0701या क्रमांकाचा रिकामा ट्रक पारोळ्याच्या दिशेने जात होता, या दोन्ही वाहनांची आमने-सामने टक्कर होऊन तीन जण जखमी झाली आहेत.
घटनेचे वृत्त समजताच पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव, सहायक पोलिस निरीक्षक तुषार देवरे, संदीप सातपुते, राजेश पाटील, अकील मुजावर, अमीत तडवी, संतोष चौधरी, विलास पाटील हे घटनास्थळी दाखल झाले व जखमींना जळगावला हलविण्यात आले. तिघेही जखमी परप्रांतीय असुन त्यांची नावे व पत्ते याबाबत माहीती मिळू शकली नाही.