जळगाव (प्रतिनिधी) दुर्धर ग्रस्त असलेल्या पत्नीचा मुंबईत उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही दुर्दैवी बातमी कळताच पतीने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना शहरातील रामेश्वर कॉलनीत घडली. आज सकाळी १० वाजता ही हृदयदावक घटना घडली. अरुण खंडू सोनवणे (वय ४७, रा. नागसेननगर, रामेश्वर कॉलनी) व पत्नी मीराबाई असे मृत दाम्पत्याचे नाव आहे.
यासंदर्भात अधिक असे की, अरूण सोनवणे हे रामेश्वर कॉलनीमध्ये पत्नी मीराबाई आणि मुलगा अनिकेत यांच्यासह राहतात. ते कृषि उत्पन्न बाजार समितीत हमालीचे काम करून कुटुंबियांचा उदरनिर्वाह करतात. दरम्यान, गेल्या काही महिन्यांपासून त्यांची पत्नी मिराबाई सोनवणे ह्या दुर्धर आजार जडला होता. त्यांनी काही दिवसांपूर्वी मुंबई येथे पुढील उपचारासाठी हलविण्यात आले होते. त्यांच्यासोबत त्यांचा मुलगा अनिकेत होता. दरम्यान, ३१ ऑक्टोबर रोजी मीराबाई सोनवणे यांचा मुंबईत खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असतांना मृत्यू झाला. दरम्यान, याबाबतचे वृत्त काळताच घरी असलेले अरूण सोनवणे यांनी आज सकाळी गळफास घेऊन आत्महत्या केली. आज सकाळी मीराबाई सोनवणे यांचा मृतदेह मुंबईहून येत असल्याने अरुण सोनवणे यांचे लहान भाऊ सुनिल सोनवणे हे घरात आवराआवर करण्यासाठी आज सोमवारी १ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता अरूण सोनवणे यांच्या घरी गेले. त्यावेळी त्यांचा घरात दरवाजा आतून बंद होता. सुनिल यांनी घरात दरवाजा तोडला असता मोठा भाऊ अरूण सोनवणे यांनी राहत्या घरात गळफास घेतल्याचे आढळून आले. अरूण सोनवणे यांना खाली उतरवून भाऊ सुनिल सोनवणे व इतरांनी तत्काळ जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आणण्यात आला. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यची नोंद करण्यात आली आहे.
















