चंद्रपूर (वृत्तसंस्था) अस्थी विसर्जन करताना बल्लारपूर तालुक्यातील नांदगाव (पोडे) येथील चंद्रपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती गोविंदा पोडे यांच्यासह तीन जण बुडाले. ही हृदयदायक घटना बल्लारपूर तालुक्यातील नांदगाव (पोडे) जवळच्या वर्धा – इरई नदीच्या संगमावर रविवारी दुपारी २ वाजता घडली. बल्लारपूर तालुक्यातील नांदगाव (पोडे) येथील रहिवासी व चंद्रपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती गोविंदा पांडुरंग पोडे (४७), त्यांचा एकुलता एक मुलगा चेतन गोविंदा पोडे (१६) व भाचा गणेश रवींद्र उपरे (१७) अशी मयतांची नावे आहेत.
मोठ्या वडिलांच्या अस्थिविसर्जनासाठी गेलेल्या चंद्रपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती गोविंदा पोडे यांच्यासह त्यांचा मुलगा आणि भाच्याचा वर्धा नदीच्या पात्रात बुडून मृत्यू झाल्याची उशिरापर्यंत तिघांचेही मृतदेह शोधण्यात यश मिळाले आहे. गोविंदा पोडे यांचे मोठे वडील नांदगाव पोडे येथील घनश्याम झित्राजी पोडे यांचे ११ नोव्हेंबर रोजी निधन झाले होते. त्यांचे अस्थिविसर्जन करण्यासाठी पोडे कुटुंबीय रविवारी (१९ नोव्हेंबर) दुपारी २ वाजताच्या सुमारास वर्धा इरई नदीच्या संगमावर गेले होते.
पूजाअर्चा करून अस्थी विसर्जन करण्यात आले. त्यावेळी चेतन पोडे व गणेश उपरे हे नदीपात्राच्या पाण्यात पोहत होते. त्यावेळी गोविंदा पोडे यांनी दोघांनाही पाण्याच्या बाहेर या, म्हणून आवाज दिला. त्यावेळी ते बाहेर निघत असताना वाहत्या पाण्याच्या प्रवाहात वाचविण्यासाठी गोविंदा पोडे यांनी नदीपात्रात उडी घेऊन त्यांना वाचविण्याचा भरपूर प्रयत्न केला, मात्र, तेदेखील वाहत्या पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले. दोघांना वाचविण्याच्या प्रयत्नात तिघांनाही जलसमाधी मिळाली. यानंतर पोलिसांनी शोध मोहीम राबवून उशिरापर्यंत चेतन गोविंदा पोडे आणि गणेश उपरे यांचा मृतदेह शोधून नदीपात्रातून बाहेर काढला. परंतु, गोविंदा पोडे यांचा मृतदेह शोधण्यासाठी उशिरापर्यंत शोधमोहीम राबविण्यात आली. अखेर त्यांचाही मृतदेह सापडला.