रावेर (प्रतिनिधी) सातपुडा पर्वत रांगांमध्ये बुधवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे नागझिरी नदीला पूर आला आहे. या पुरात दोन जणांचा मृत्यू झाला. तर रावेरचे माजी उपनगराध्यक्ष हे पुरात बेपत्ता झाले आहेत. बळीराम रायसिग बारेला (४५, रा. मोरव्हाल ता. रावेर) आणि शेख इकबाल शेख सत्तार कुरेशी (५८, रा. कुरेशी वाडा, रावेर) अशी पुरामधील मृतांची नावे आहेत.
या संदर्भात अधिक असे की, बळीराम बारेला हे मोरव्हाल गावातून शेताकडे जात असताना अचानक आलेल्या पुरात वाहून गेले. तर शेख इकबाल यांचे घर नदी किनारीच आहे. त्यांच्या घरात पुराचे पाणी घुसल्याने त्यात त्यांचा बुडून मृत्यू झाला. दुसरीकडे रावेरचे माजी उपनगराध्यक्ष सुधीर गोपाळ पाटील हे पुराच्या पाण्यात बेपत्ता आहेत. त्यांची मोटारसायकल नदीकिनारी आढळून आल्याचे कळते. तर दुसरीकडे रावेर तालुक्यातील रमजीपुर, रसलपुर, खिरोदा गावांमध्ये अनेक घरांमध्ये दुकानांमध्ये पाणी शिरले आहे. तसेच रमजीपुरमध्ये आलेल्या पुरामुळे चार गुरे वाहून गेले आहेत. दरम्यान, घरामध्ये पाणी शिरल्याने मोठे नुकसान झाले आहे.
रावेर तालुक्यातील सुकी (गारबर्डी) धरण बुधवारी रात्री १:३० वाजेच्या शंभर टक्के भरले आहे. तर भुसावळ नजीक असलेले हतनूर धरणाचे चार दरवाजे गुरुवारी सकाळी दहा वाजता उघडण्यात आले आहेत. या घटनेनं तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे. एक चारचाकी गाडी वाहून गेली. गाडीतील प्रवासी यांनी वेळीच गाडीतून उडी घेत ते बाहेर पडल्याने सुदैवाने सर्व प्रवासी बचावले आहेत. दरम्यान याठिकाणी रात्रीपासून जिल्हा प्रशासनाच्या वतीने बचावकार्य सुरु असून नागरिकांचे प्राण वाचविण्यात आले.