चंद्रपूर (वृत्तसंस्था) ठाकरे गटाचे युवासेना चंद्रपूर शहरप्रमुख शिवा मिलिंद वझरकर (वय २३) यांची दि. २५ जानेवारीच्या रात्री पोटात धारदार चाकूने भोसकून निर्घृण हत्या करण्यात आली. याप्रकरणी शिवसेना ठाकरे गटाच्या वाहतूक सेनेचा जिल्हाप्रमुख स्वप्निल काशिकर (३८) याच्यासह ८ जणांना अटक करण्यात आली आहे.
क्षुल्लक वादातून खून !
अटकेतील आरोपीमध्ये हिमांशू कुमरे (२५), चैतन्य आसकर (२०), रिझवान पठाण (२५), नासीर खान (२१), रोहीत पितरकर (२४), सुमित दाते (२७) आणि अन्सार खान (२५) यांचा समावेश असून, सर्व चंद्रपुरातील रहिवासी आहेत. अगदीच क्षुल्लक कारणावरून शिवा वझरकरची हत्या करण्यात आल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे. रेतीमाफिया म्हणून कुप्रसिद्ध असलेल्या काशिकरचे शास्त्रीनगर परिसरात कार्यालय आहे. घटनेच्या दिवशी हिमांशु कुमरे याने शिवाला भ्रमणध्वनीवरून शिवीगाळ केली. त्याच्या वडिलाला भ्रमणध्वनीवर अपमानास्पद बोलला. त्यामुळे दोघांत बाचाबाची झाली. शिवाला काशिकरच्या कार्यालयात बोलाविण्यात आले. तिथेही बाचाबाची झाली. वाद इतका विकोपाला गेला की, शिवाच्या पोटात चाकू भोसकला. त्यामुळे तो खाली पडला. अशाही परिस्थितीत शिवाला सर्वांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. यात तो जागीच ठार झाला.
संशयितांना पाच दिवसांची पोलीस कोठडी !
या प्रकरणी रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिवा हत्या प्रकरणातील मुख्य सूत्रधार वाळूतस्कर स्वप्निल काशिकर, रिझवान पठाण आणि नाझिर खान या तिघांना घटनेच्या दिवशीच रात्री अटक करण्यात आली. तिघांनाही न्यायालयात हजर केले असता पाच दिवसांची पोलीस कोठडी ठोठावण्यात आली. उर्वरित पाच जण हिमांशु कुमरे, चैतन्य आसकर, रोहीत पितरकर, सुमित दाते व अन्सार खानला २६ आणि २७ जानेवारी रोजी अटक करण्यात आली. सर्व आरोपींना न्यायालयाने ३० जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे.
सखोल चौकशी सुरू !
प्राथमिक तपासात क्षुल्लक कारण सांगितले जात असले तरी नेमक्या कोणत्या कारणारून हत्या करण्यात आली, याबाबत सखोल चौकशी सुरू आहे. शिवा वझरकर हा मिलिंद वझरकर यांचा एकुलता एक मुलगा होता. त्याच्या हत्येने वझरकर कुटुंब प्रचंड हादरले आहे. २६ जानेवारी रोजी सायंकाळी शिवाच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. वाळू तस्करीतील वर्चस्वातून ही हत्या झाल्याची चर्चा आहे. दरम्यान, पोलिसांनी ३०२, १४३, १४७, १४८, १४९ भादंवि १३५ अन्वये गुन्हा दाखल करून आठ जणांना अटक केली आहे. पुढील तपास रामनगर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक राजेश मुळे करत आहेत.