लातूर (वृत्तसंस्था) दारू पिऊन घरच्यांना त्रास देण्यासह चोऱ्या-माऱ्या करणाऱ्या सख्ख्या मोठ्या भावाचा लहान भावानेच शेतात झोपलेल्या जागी डोक्यात कुऱ्हाडीचे घाव घालून निर्घृण खून केल्याची घटना शिरूर अनंतपाळ तालुक्यातील सावरगाव शिवारात गुरुवारी (दि. २) रात्रीच्या सुमारास घडली. धक्कादायक म्हणजे या घटनेनंतर वडिलांनी देखील गळफास घेत आत्महत्या केली.
लातूर तालुक्यातील मुशीराबाद येथील तानाजी संतराम काळे (रा. मुशीराबाद ता. जि. लातूर) असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. त्यांची शिरूर अनंतपाळ तालुक्यातील सावरगाव शिवारात शेती आहे. त्यांना दोन मुले आहेत. मोठा मुलगा शिवाजी तानाजी काळे हा अविवाहित आहे. तो सतत दारु पिऊन गावात व परिसरात लहानसहान चोऱ्या करीत होता. दिवसभर दारुच्या नशेत राहत होता. त्याच्या चोऱ्यांमुळे गावातील नागरिक घरी येऊन कुटुंबीयांना जाब विचारात होते.
गावातील नागरिक व पोलिसांच्या चौकशीला घरचे लोक त्रासून गेले होते.
यामुळे लहान भाऊ बालाजी तानाजी काळे याने त्याचा मोठा भाऊ शिवाजी काळे याच्यामुळे होणाऱ्या त्रासाला कंटाळून बालाजी याने शेतात झोपलेल्या शिवाजी काळे याच्या डोक्यात कुऱ्हाडीचे घाव घालून त्याला जागीच ठार केले. ही घटना गुरूवारी (दि. २) रात्री ९.३० ते ११.३० च्या दरम्यान घटना घडली.
मयताची बहीण अहिल्या जितीन हुडे (वय २८ रा. बागझरी ता. अंबाजोगाई जि. बीड हा. मु. मुशीराबाद ता. जि. लातूर) यांच्या फिर्यादीवरून शिरुर अनंतपाळ पोलीस ठाण्यात गुन्हा रजि नंबर १९२ / २३ कलम ३०२ भादवी प्रमाणे आरोपी बालाजी तानाजी काळे (रा. मुशीराबाद ता. जि. लातूर) यांच्या विरुद्ध दि. ३ नोव्हेंबर रोजी उशीरा गुन्हा दाखल करून आरोपीला अटक करण्यात आली आहे. यावेळी पोलिसांच्या चौकशीच्या भीतीपोटी मयताचे वडील तानाजी संतराम काळे यांनी मुशीराबाद येथे गळफास घेऊन आत्महत्या केली.
यावेळी खुनासाठी वापरण्यात आलेली कुऱ्हाड जप्त करण्यात आली आहे. आरोपीने मीच खून केल्याची कबुली दिल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. पुढील तपास पोलीस निरीक्षक विठ्ठल दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक चंदनसिंह परिहार करीत आहेत. तानाजी संतराम काळे यांच्या मृत्यूची लातूर ग्रामीण पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. याबाबतचे वृत्त आज स्थानिक माध्यमांनी दिले आहे.