सावदा (प्रतिनिधी) सावदा शिवारातील कोचूर रोडवरील एका शेतात काम करणार्या सालदाराचा शेतातील खोलीत डोक्यात दगड घालून खून करण्यात आल्याची घटना शनिवार, 30 रोजी सकाळी उघडकीस आली होती. या घटनेत सुभाराम रिच्छू बारेला (45, आंबळी, ता.झिरण्या, जि.खरगोन म.प्र) याचा खून करण्यात आला होता. सावदा पोलिसांनी अवघ्या चार तासात खुनाची उकली केली असून दोन आरोपींना अटक केली आहे. सुकलाल रतन लोहारे (रा.नेपानगर) व अर्जुन मुन्ना आवासे (बर्हाणपूर मध्यप्रदेश) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. जुन्या वादातून हा आरोपीनी हा खून केल्याची कबुली पोलिसांना दिली आहे.
डोक्यात दगड घालून केली हत्या
सावदा ते कोचूर रोडवर असलेल्या गट नं.656 ही शेतजमीन लोकेश सुभाष बेंडाळे व कुटुंबियांची असून या शेतात सुभाराम बारेला (आंबळी) हा सालदार म्हणून कामास होता व तो शेतात बांधलेल्या खोलीतच वास्तव्यास होता. शनिवार, 30 रोजी सकाळी शेतातील मजूर तथा ट्रॅक्टर चालक अनिल तायडे यास शेतमालक यास सुभाराम यास बोलावण्यास पाठवले असता खुनाचा प्रकार उघडकीस आला. सावदा पोलिसांना माहिती दिल्यानंतर सहाय्यक निरीक्षक जालिंदर पळे व सहकार्यांनी धाव घेतली. लोकेश बेंडाळे यांच्या फिर्यादीवरून अज्ञात आरोपींविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला.
चार तासात गुन्ह्याची उकल
सावद्याचे सहा.निरीक्षक जालिंदर पळे व पथकाने धाव तपासाची चक्रे वेगाने फिरवून आजुबाजुच्या परीसरातील सालगडी म्हणून काम करणार्या सर्व मजुरांची माहिती घेतली त्यावरुन दोन सालगडी त्याचे कामाच्या व राहण्याचे ठिकाणी नसल्याचे कळाले तर मालकाकडून शनिवारीच पैसे घेवून ते गावी गेल्याचे कळल्यानंतर पोलिसांचा संशय बळावला. एका आरोपीचे नातेवाईक उदळी येथे असल्याचे कळाल्यानंतर गोपनीय माहितीवरून आरोपींना अटक करण्यात आली. यापूर्वी झालेल्या वादाच्या रागातून शनिवारी मध्यरात्री मयताच्या डोक्यात दगड टाकल्याची कबुली आरोपींनी दिली. अवघ्या चार तासात गुन्ह्याची उकल करण्यात सावदा पोलिसांना यश आले.
यांनी उघडकीस आणला गुन्हा
जळगाव पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांच्या मार्गदर्शनाखाली सहा.निरीक्षक जालिंदर पळे, पोलीस उपनिरीक्षक अमोल गर्जे, एएसआय संजय देवरे, हवालदार विनोद पाटील, हवालदार यशवंत टहाकळे, हवालदार देवेंद्र पाटील, हवालदार विनोद तडवी, प्रकाश जोशी, किरण पाटील आदींच्या पथकाने गुन्हा उघडकीस आणला.