टोकयो (वृत्तसंस्था) टोकयो पॅरालिम्पिक स्पर्धेत भारतानं नेमबाजीत आणखी दोन पदकांची कमाई केली आहे. भारताच्या मनीष नरवाल आणि सिंहराज यांनी पी४ मिश्रित ५० मीटर पिस्तूल एसएच१ नेमबाजीमध्ये अनुक्रमे सुवर्ण आणि रौप्य पदक मिळवले आहे. भारताच्या खात्यात आता एकूण १५ पदकं झाली आहेत.
१९ वर्षीय नरवालने २१८.२ गुण मिळवत पॅरालिम्पिकमध्ये विक्रम केला आहे. दुसरीकडे, एस मीटर एयर पिस्तूल एसएच1 स्पर्धेत मंगळवारी कांस्य जिंकणाऱ्या सिंहराजने २१६.७ गुणांसह रौप्य पदक जिंकले. रशियन ऑलिम्पिक समितीचे सेर्गेई मालिशेव यांनी १९६.८ गुणांसह कांस्यपदक जिंकले. यापूर्वी पात्रता फेरीत सिंहराज अदाना ५३६ गुणांसह चौथ्या आणि नरवाल ५३३ गुणांसह सातव्या स्थानावर होता.
भारताची सर्वोत्तम कामगिरी
पॅरालिम्पिक स्पर्धेच्या इतिहासातील सर्वोत्तम कामगिरी भारतानं टोकयोमध्ये नोंदवली आहे. या स्पर्धेत भारतीय टीमनं आत्तापर्यंत ३ गोल्ड, ७ सिल्व्हर आणि ५ ब्रॉन्झ असे एकूण १५ मेडल पटकावले आहेत.