नवी दिल्ली (वृत्तसंस्था) दिल्लीतील शेतकऱ्यांच्या नियोजित ट्रॅक्टर रॅलीने हिंसक वळण घेतल्यानंतर आता मोदी सरकारकडून काही महत्त्वपूर्ण पावले उचलण्यात आली आहेत. आताची चिघळलेली परिस्थिती पाहता गृहमंत्रालयाकडून दिल्लीतील सिंघू, टिकरी, गाजीपूर बॉर्डर, नांगलोई, मुकरबा चौक परिसरातील इंटरनेट सेवा आज रात्री १२ वाजेपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच इंडिया गेटकडे जाणारे सर्व रस्ते बंद ठेवण्यात आले आहे.
पंतप्रधान निवासस्थानाबाहेर आणि राष्ट्रपतीभवनाबाहेरील सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. तसेच सर्व महत्वाच्या व्यक्तींच्या घराबाहेर सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. आंदोलन हिंसक वळण घेत असल्याने दिल्ली मेट्रोच्या अनेक स्थानकांचे प्रवेश आणि बाहेर येणारे दरवाजे बंद करण्यात आले आहेत. मात्र हे हिंसक आंदोलन अजून पेटू नये म्हणून अफवांना आळा बसावा आणि सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर गृह मंत्रालयाकडून संबंधित भागातील इंटरनेट सेवा आणि टेलिकॉम सेवा बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. ही सेवा आज रात्री १२ वाजेपर्यंत बंद राहील.
नवी दिल्लीत शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर रॅलीवर पोलिसांनी लाठीमार केल्यानंतर दिल्लीत तणाव निर्माण झाला आहे. आयटीओ येथे शेतकऱ्यांनी पोलिसांची व्हॅन, क्रेन ताब्यात घेतली आहे. त्यामुळे पोलीस या आंदोलकांना पांगवण्यासाठी लाठीमार करत आहे. शेतकरी आंदोलन अधिकच चिघळल्याने दिल्लीतील मेट्रो सेवा बंद करण्यात आली आहे. अनेक ठिकाणची वाहतूक बंद करण्यात आली आहे.