साप्ताहिक राशिभविष्य, १५ ते २२ मे २०२२ : या आठवड्यात सूर्यही राशी बदलून वृषभ राशीत प्रवेश करेल.
मेष :
सप्ताह एकूणच सावधगिरी बाळगण्याचा. चंद्रग्रहणाच्या पार्श्वभूमीवर सप्ताहाच्या सुरुवातीला भरणी नक्षत्राच्या व्यक्तींनी दुखापतींपासून जपावं. कृतिका नक्षत्राच्या व्यक्तींना ता. १७ व १८ हे दिवस ग्रहयोगातून उच्चदाबाचे. घरातील विशिष्ट परिस्थितीतून छायाग्रस्त राहाल. अश्विनी नक्षत्राच्या व्यक्तींना २० चा शुक्रवार वैयक्तिक सुवार्तांचा.
वृषभ :
कृतिका नक्षत्राच्या व्यक्तींना चंद्रग्रहणाच्या पार्श्वभूमीवरील ग्रहयोग सार्वजनिक घटक गोष्टींतून मनस्तापाचे. लोकापवादातून त्रास. बाकी सप्ताहाचा शेवट मोठे चमत्कार घडवेल. मृग नक्षत्राच्या व्यक्तींना ता. १५ व २० हे दिवस महत्त्वाच्या कामांचे. मात्र, सप्ताहात कुपथ्यं टाळा. रोहिणी नक्षत्राच्या व्यक्तींना विनाकारण दगदग आणि कष्ट.
मिथुन :
सप्ताह तरुणांना तारुण्याच्या व्यथा वाढवू शकतो. व्यर्थ कल्पनाविश्वात राहू नका. बाकी सप्ताह हरहुन्नरी तरुणांना छानच. कलाकारांचे भाग्योदय. मृग नक्षत्राच्या व्यक्तींनी प्रवासात चीजवस्तू जपाव्यात. पुनर्वसू नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहाचा शेवट मोठा यशदायी. मात्र, ता. १६ व १७ हे दिवस स्त्रीवर्गास संशयपिशाच्चातून त्रासाचे.
कर्क :
आश्लेषा नक्षत्राच्या व्यक्ती उद्याच्या ग्रहणयुक्त पौर्णिमेच्या प्रभावात विचित्र मानसिक प्रदूषणाच्या अमलाखाली येतील. बाकी सप्ताहाचा शेवट पुष्य नक्षत्राच्या व्यक्तींना मोठा आनंददायक. पुनर्वसू नक्षत्राच्या व्यक्तींना नोकरीच्या मुलाखतींतून यश. व्यावसायिक वसुली. आश्लेषा नक्षत्राच्या व्यक्तींना शुक्रवार घरात सुवार्तांचा.
सिंह :
सप्ताह प्रवासात बेरंग करू शकतो. उद्याची ग्रहणयुक्त पौर्णिमा अपवादात्मक अशी बोलू शकते. उत्तरा व्यक्तींनी सांभाळावंच. बाकी सप्ताहाचा शेवट बुधाच्या विशिष्ट स्थितीतून स्वतंत्र व्यावसायिकांना मोठे लाभ देईल. मघा नक्षत्राचा मोठा शुभारंभ. पूर्वा नक्षत्राच्या व्यक्तींना शेअर बाजारात लाभ.
कन्या :
सप्ताह चंद्रग्रहणाच्या पार्श्वभूमीवर आरंभी दुखापतींतून जपण्याचा. घरातील ज्येष्ठांची काळजी घ्या. पैशांचं पाकीट जपा. चित्रा नक्षत्राच्या व्यक्ती लक्ष्य होऊ शकतात. बाकी ता. १९ ते २१ हे दिवस सुवार्तांची छान संगत ठेवतील. हस्त नक्षत्राच्या व्यक्ती मौजमजा करतील. बलवत्तर विवाहयोग. उत्तरा नक्षत्राच्या व्यक्तींचा सन्मान होईल.
तूळ :
विशाखा नक्षत्राच्या व्यक्ती चंद्रग्रहणाच्या पार्श्वभूमीवर क्षतिग्रस्त होऊ शकतात. घरात वादाचा केंद्रबिंदू व्हाल. स्वाती नक्षत्रास वक्री बुधाची विशिष्ट स्थिती. सप्ताहाचा शेवट विचित्र संसर्गाचा. श्वानदंशापासून जपा. चित्रा नक्षत्राच्या व्यक्तींसाठी गुरुवार मोठ्या लाभाचा. स्वाती नक्षत्राच्या व्यक्तींना शुक्रवार मोठ्या कौतुकाची.
वृश्चिक :
उद्याची ग्रहणयुक्त पौर्णिमा गर्दीच्या ठिकाणी व वाहतुकीत जपण्याची. ज्येष्ठ व्यक्ती अपवादात्मक प्रसंग अनुभवू शकतात. बाकी ता. १९ ते २१ हे दिवस विशाखा आणि अनुराधा नक्षत्राच्या व्यक्तींसाठी छानच. मोठी प्राप्ती. ज्येष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींना पुत्रोत्कर्षातून आनंदाश्रू.
धनू :
सप्ताहात शुभग्रहांचं उत्तम अधिष्ठान राहील. मात्र, सप्ताहात मूळ नक्षत्राच्या व्यक्तींनी जुगार टाळावा. उद्याच्या ग्रहणयुक्त पौर्णिमेजवळ प्रवासात जपा. तरुणांनी प्रेमरोगाच्या प्रभावाखाली येऊ नयेच. बाकी ता. १९ ते २१ हे दिवस चढत्या क्रमाने शुभ. पूर्वाषाढा नक्षत्राच्या व्यक्ती सेलिब्रिटी होतील. नूतन गृहप्रवेश होईल.
मकर :
उद्याच्या ग्रहणयुक्त पौर्णिमेच्या पार्श्वभूमीवर लक्ष्य होणारी रास. धनिष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींनी जास्त सांभाळावं. बाकी उत्तराषाढा व्यक्तींना ता. १९ ते २१ हे दिवस अतिशय प्रवाही. मोठे करारमदार. व्यावसायिक शुभारंभ. श्रवण नक्षत्राच्या व्यक्तींना विशिष्ट सरकारी लाभ.
कुंभ :
सप्ताहातील आरंभीची ग्रहणयुक्त पौर्णिमा एक व्हायरस राहील. काल्पनिक भयभीतीचा पगडा राहू शकतो. पूर्वाभाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्तींना नुकसानीचं भय सतावेल. गृहिणीवर्गास एखादं संशयपिशाच्च सतावेल. बाकी शततारका नक्षत्राच्या व्यक्तींना ता. १९ ते २१ हे दिवस घरात प्रसन्न ठेवतील. धनिष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींना नोकरीची संधी.
मीन :
सप्ताहाच्या सुरुवातीस रेवती नक्षत्राच्या व्यक्तींना आरोग्यविषयक तक्रारींचं उगाचंच गांभीर्य वाटेल. बाकी सप्ताहाचा शेवट वैयक्तिक सुवार्तांतून फ्लॅशन्यूज देईल. विवाहस्थळाचा गांभीर्याने विचार कराल. उत्तरा भाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्तींस ता. १७ चा मंगळवार मोठ्या विजयोत्सवाचा. नोकरीत भाग्योदय. पुत्रोत्कर्ष होईल.