नवी दिल्ली (वृत्तसंस्था) एका 15 वर्षाच्या मुलाने वाय-फाय कनेक्शन (Wi-Fi Connection) बंद झाल्याने रागात आपल्या आई, वडील आणि लहान भावाची गोळी झाडून हत्या (Minor Boy Killed his Parents) केली आहे. इतकंच नाही तर तीन दिवस तो त्यांच्या मृतदेहांसोबत घरातच बंद राहिला. ही घटना स्पेनमधील आहे. आरोपी असलेल्या अल्पवयीन मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
एका वृत्तानुसार, शाळेत कमी मार्क्स मिळाल्याने आणि घरातील कामात मदत करत नसल्याने या मुलाच्या आईने त्याचं वाय-फाय कनेक्शन बंद केलं होतं. संतापलेल्या मुलाने याच कारणामुळे शॉटगनने आपली आई, वडील आणि १० वर्षांचा भाऊ यांची गोळी मारून हत्या केली. तो तीन दिवस या मृतदेहांसोबत घरातच बसून राहिला आणि नंतर त्याने आपल्या नातेवाईकांना घटनेची माहिती दिली. त्याने एल्श पोलीस ठाण्यात आपला गुन्हा मान्य केला आहे. सध्या तो पोलिसांच्या ताब्यात आहे.
धक्कादायक घटनेचा खुलासा झाल्यानंतर या तिहेरी हत्याकांडामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणाचा तपास केला जात आहे. अल्पवयीन आरोपीला ताब्यात घेण्यात आलं आहे. त्याने आपला गुन्हा मान्य केला आहे. वाय-फाय कनेक्शन बंद केल्याने तो नाराज होता. याच कारणामुळे त्याने आपल्या आई-वडिलांसह भावाची हत्या केली.