नाशिक (प्रतिनिधी) पेठ रोडवरील शरदचंद्र पवार मार्केट यार्डामागील अपार्टमेंटमधील एका घराचा दरवाजा तोडत घरात प्रवेश करून तब्बल पाच लाख ६३ हजार ७५० रुपयांची जबरी घरफोडी झाली आहे. याप्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ऋषिकेश मधुकर दराडे (वय ३०, रा. आर. के. प्राइड अपार्टमेंट, समर्थनगर, शरदचंद्र पवार मार्केटच्या पाठीमागे, नाशिक) यांनी याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीनुसार १२ ऑगस्ट २०२५ रोजी दुपारी ३ ते ४ च्या सुमारास चोरट्यांनी ऋषिकेश दराडे यांच्या फ्लॅट क्रमांक ५ च्या दरवाजाचा कोयंडा तोडून घरात प्रवेश केला. चोरट्यांनी दराडे व त्यांची सासू मंगला सानप यांचे सोन्याचे दागिने चोरून नेले. या घरफोडीत ८२,५०० रुपयांचा १६.५०० ग्रॅम वजनाचा सोन्याचा नेकलेस, एक लाख रुपये किमतीची दोन तोळे वजनाची सोन्याची पोत, पाच ग्रॅम वजनाची २५ हजार रुपयांची सोन्याची अंगठी, १२ हजार ५०० रुपयांची २.५०० ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी, १६ हजार २५० रुपयांचे ३.२५० ग्रॅम वजनाचे कानातील झुबे, १२ हजार ५०० रुपयांच्या अडीच ग्रॅम वजनाच्या तीन सोन्याच्या नथी, ५५ हजार रुपयांची पाच ग्रॅम वजनाची एक सोन्याची चेन व एक ग्रॅम वजनाचे सोन्याचे ओम पान, ५५ हजार रुपयांचे पाच ग्रॅम वजनाचे सोन्याचे दोन कानातले व दोन वेल व एक ग्रॅम वजनाचे सोन्याचे ओम पान, एक लाख ७५ हजार रुपये किमतीची २४ ग्रॅम वजनाची सोन्याची एक चेन, एक तोळा वजनाची सोन्याची एक पोत व एक ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी असा एकूण पाच लाख ६३ हजार ७५० रुपयांचा मुद्देमाल चोरीस गेला. याप्रकरणी पोलिस उपनिरीक्षक सचिन चव्हाण तपास करीत आहेत.
















