सांगली (वृत्तसंस्था) : घरी आलेल्या पाहुण्यांचा योग्य सन्मान राखता. मग, गणपतीचा किती राखायला हवा? चित्रपटाची गाणी लावणे, त्यावर बीभत्स नृत्य करणं हे प्रकार बंद व्हायला हवेत, असं मत कालीपुत्र कालीचरण महाराज यांनी व्यक्त केलंय. सांगलीत शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानच्या वतीनं प्रथमच कावड यात्रा काढण्यात आली. कालीचरण महाराजांच्या उपस्थितीत ही यात्रा पार पडली.
कालीचरण महाराज म्हणाले, गणेशोत्सव जवळ आला असून आपण गणपतीचे कशापद्धतीनं पूजन करतो, त्याला कसा निरोप देतो याचा विचार करायला हवा. घरी आलेल्या पाहुण्याला आपण सन्मानानं निरोप देतो. पण, गणपतीला अनेकदा तेवढा सन्मान का मिळत नाही? त्याच्यासमोर चित्रपटाची गाणी लावली जातात. विसर्जन मिरवणुकीत तशीच गाणी व नृत्य सादर केलं जातात. या गोष्टी अयोग्य आहेत. मनातून परमेश्वर मानला पाहिजे. मनानं तो मानला नाही, तर राक्षसी प्रवृत्तीचा वास शरीरात होतो. त्यामुळं तीर्थक्षेत्रांचं दर्शन घेण्यानंही माणसाला परमेश्वराच्या कृपादृष्टीचा लाभ होतो, असं त्यांनी स्पष्ट केलं. सांगलीच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या (Chhatrapati Shivaji Maharaj) पुतळ्यास अभिवादन करून यात्रेस सुरुवात झाली. कालीचरण महाराज यांच्याहस्ते शिवरायांना पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर कावड पूजन करण्यात आलं. कावड पूजनानंतर कालीचरण यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केलं. महाराजांचं हे विधान चर्चेचा विषय बनलंय.