मुंबई (वृत्तसंस्था) कोरोना प्रतिबंधक लस अद्याप बाजारात आलेली नाही, त्यामुळे कोरोनाच्या संसर्गाचा धोका टळलेला नाही. कोविड-१९ मुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता या वर्षी नाताळ उत्सव साध्या पद्धतीने व गृह विभागाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार साजरा करावा, असं आवाहन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केलं आहे.
या पार्श्वभूमीवर दोन दिवसांवर येऊन ठेपलेल्या ख्रिश्चन धर्मियांच्या नाताळ सणासाठी राज्य सरकारने नियमावली जाहीर केली आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मंगळवारी ख्रिश्चन बांधवांना नाताळ सण साध्या स्वरुपात आणि कोरोनाचा संसर्ग टाळण्याच्या दृष्टीने खबरदारी घेऊन साजरा करण्याचे आवाहन केले आहे. ख्रिश्चन बांधवांनी या वर्षीचा नाताळचा सण साध्या पद्धतीने साजरा करावा. नाताळ सणानिमित्त चर्चमध्ये जास्तीत जास्त ५० लोकांच्या उपस्थितीत विशेष प्रार्थना सभेचे आयोजन करावे. चर्चमध्ये त्यावेळी कोणत्याही प्रकारे गर्दी होणार नाही व शारिरीक अंतर (फिजिकल डिस्टन्सिंग) राखले जाईल याची प्रामुख्याने काळजी घ्यावी. विशेष म्हणजे चर्चमध्ये निर्जंतुकीकरणाची व्यवस्था करण्यात यावी. मास्क व सॅनिटायझरचा वापर होईल याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. युकेमध्ये कोरोनाचा नवा विषाणू आढळून आल्याच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने कालपासून संपूर्ण राज्यात नाईट कर्फ्यूची घोषणा केली आहे. त्यानुसार, रात्री ११ ते पहाटे ६ वाजेपर्यंत कोणालाही घराबाहेर पडता येणार नाही. चर्चमध्ये प्रार्थनेसाठी जाताना सर्वांना तोंडावर मास्क लावणे बंधनकारक असेल. चर्चमधील एका कॉयरमध्ये (गायन स्थळ) १० पेक्षा अधिक लोक असता कामा नयेत. तसेच कॉयरमध्ये वापरले जाणारे माईक हे देखील स्वच्छ केलेले असावेत. नाताळ साजरा करताना ६० वर्षांवरील नागरिक आणि १० वर्षांखालील लहान मुलांची विशेष काळजी घेतली जावी. या वयोगटातील लोकांनी शक्यतो घऱाबाहेर पडू नये घरातच सेलिब्रेशन करावं असा सल्ला गृहखात्यानं दिला आहे. अनेक लोक गोळा होऊन गर्दी करतील अशा पद्धतीने कार्यक्रमाचे आयोजन केले जाऊ नये. त्याचबरोबर फटाके वाजवता येणार नाहीत, असंही या नियमावलीत म्हटलं आहे. ३१ डिसेंबर रोजी चर्चमध्ये ‘थँक्स गिव्हिंग’ कार्यक्रमाचे रात्री ७ वाजण्याच्या सुमारास किंवा त्यापेक्षा आधी आयोजन करावे. मध्य रात्री या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येऊ नये. प्रत्येकानं तोंडाला मास्क लावणे आणि फिजिकल डिस्टंसिंगचे पालन करणे हे सर्वांनी प्राधान्याने पाळणं आवश्यक आहे. सार्वजिनक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर एकत्र येऊन गर्दी टाळण्याचे आवाहनही गृह खात्याकडून करण्यात आले आहे.