नशिराबाद (सुनिल महाजन) मातोश्री पाणंद योजनेतून जळगाव ग्रामीण मतदार संघात शंभर शेत रस्त्याचे कामे झाली असून आणखी शंभर रस्त्याचे कामे केली जात आहेत. त्यामुळे दोनशे शेतरस्ते करणारा महाराष्ट्रातून मी पाहिला मंत्री असल्याचं वक्तव्य पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी केलं.
जळगाव जिल्ह्यातील नशिराबाद प्राथमिक आरोग्य केंद्राच्या उद्घाटनप्रसंगी केले आहे. मातोश्री पानंद योजनेतून एका किलोमीटर रस्त्याच्या कामाला २५ लाख रुपये निधी आहे. असे २५कोटी रूपयांचे शंभर रस्ते मंजूरीसाठी टाकले आहे. यामुळे दोनशे रस्ते करणारा मी पहिला मंत्री असल्याचे यावेळी ते म्हणाले. तसेच शेळगाव बॅरेजवरील पुलासाठी ४४ कोटी रूपयांच्या कामाचे भुमिपूजन पुढील आठवड्यात करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
जिल्ह्यासाठी एकत्र यावे
शेळगाव बॅरेजच्या पुलाच्या कामासंबंधीत बोलताना पाटील म्हणाले, की याकरीता स्व. हरीभाऊ जावळे यांनी पाठपुरावा केला होता. आता मी करत असून आमदार शिरीष चौधरी यांनी देखील मदत केली. असे सांगताना त्यांनी जिल्ह्याच्या विकासासाठी सर्व आमदारांनी एकत्र यायला हवे. विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रात सर्व आमदार एकत्र येतात व विकास करत असतात. त्यानुसार उत्तर महाराष्ट्रात ५६ आमदार असून सर्वांनी एकत्र आल्यास निधी खेचता येईल. आपला पक्ष वाढविण्याचे काम सर्वांनी करावे; परंतु, जिल्ह्याच्या विकासासाठी एकत्र यायला हवे असे आवाहन केले. मात्र जळगाव जिल्ह्यात एकमेकांचे पाय खेचण्याचे काम होत असल्याचा टोला देखील त्यांनी बोलताना लगावला.
















