भंडारा (वृत्तसंस्था) ‘मी मोदींना मारू शकतो, शिव्या देऊ शकतो’ असे विधान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केले आहे. भंडाऱ्याच्या प्रचारसभेनंतर नाना पटोले यांनी हे वादग्रस्त वक्तव्य केले आहे. त्यामुळे राजकारण पेटण्याची शक्यता आहे.
लोकसभेची निवडणूक हरल्यानंतर नाना पटोले हे ऑक्टोबर २०१९ मध्ये साकोली विधानसभा क्षेत्रातून निवडणूक रिंगणात उतरले होते. त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे परिणय फुके यांच्या प्रचारासाठी साकोली येथे आले होते. याच गोष्टीचा राग धरून नाना पटोले हे वारंवार मोदींवर वक्तव्य करीत आहे. रविवारी सायंकाळी लाखनी तालुक्यातील जेवनाळा येथे प्रचार सभेत काही नागरिकांनी आपल्या समस्या मांडल्या. यावेळी नाना पटोले यांनी आपली ताकद वाढली असून, ‘आपण पंतप्रधान मोदी यांना मारू ही शकतो व शिव्याही देऊ शकतो’ असे सांगत कार्यकर्त्यांमध्ये हवा भरली. मात्र, एका राष्ट्रीय पक्षाचे प्रदेशाध्यक्ष देशाच्या पंतप्रधानानबद्दल असे वक्तव्य करणे हे महाराष्ट्राच्या संस्कृतीला साजेसे वाटत नाही.
भारतामध्ये कोरोना महामारी नरेंद्र मोदी यांनी लोकांना मारण्यासाठी आणली. मोदी सरकार लोकांना मारायला लागले आहे. गरीब कुटुंबांना दारिद्र्य रेषेच्या वर आणण्यासाठी गॅस सिलिंडर दिले व आता पुढील काळात ज्याच्याकडे गॅस सिलिंडर आहे तो सधन घोषित करण्याचा केंद्र सरकारचा डाव असल्याचे वक्तव्यही नाना पटोले यांनी केले.