बीड (वृत्तसंस्था) सामाजिक न्यायमंत्री आणि बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्यावरील बलात्काराचा आरोप रेणू शर्मा यांनी मागे घेतला आहे. या आरोपातून मुक्तता झाल्यानंतर धनंजय मुंडे प्रजासत्ताक दिनानिमित्त बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. प्रसार माध्यमाशी संवाद साधताना धनंजय मुंडे म्हणाले की, “देवाचा प्रसाद असतो, तसे तुमचे आशीर्वाद माझ्या पाठीशी आहेत. अशा कठीण प्रसंगामध्ये तुम्ही सर्वांनी माझ्या पाठीशी उभे राहून दिलेल्या साथीबद्दल मी शब्दात आभार मानू शकत नाही. अशी प्रतिक्रिया मुंडेंनी दिली.
काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर रेणू शर्मा नावाच्या महिलेने बलात्काराचा आरोप केला होता. त्यानंतर राज्यभर खळबळ माजली होती. विरोधकांनी मुंडेंवर टीका केल्या होत्या. परंतु, काही दिवसानंतर त्या महिलेने आपली तक्रार मागे घेतली. यावर धनंजय मुंडे काय बोलणार, याची सर्वजण प्रतिक्षा करत होते. अखेर आज धनंजय मुंडे यांनी मौन सोडले आहे. बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असतांना जिल्ह्यातील कार्यकर्ते आणि चाहत्यांनी त्यांचं जोरदार स्वागत केलं. कार्यकर्त्यांचं हे प्रेम पाहून धनंजय मुंडे चांगलेच भावनाविवश झाल्याचं पाहायला मिळालं. अंगावरील कातड्याचे जोडे करुन आपल्याला दिले तरी आपल्या उपकाराची परतफेड करता येणार नाही, अशा शब्दात मुंडे यांनी कार्यकर्त्यांचे आभार मानले.
बीड जिल्ह्याचे पालकमंत्री असलेले धनंजय मुंडे आज प्रजासत्ताक दिनानिमित्त बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. ध्वजारोहण पार पडल्यानंतर मुंडे बीडच्या विश्रामगृहात थांबले. त्यावेळी मुंडे यांना भेटण्यासाठी नागरिकांनी नेहमीप्रमाणे तोबा गर्दी केली होती. त्यावेळी नागरिकांच्या प्रश्नांवरुन मुंडे यांनी अधिकाऱ्यांना रस्त्यावरच जाब विचारत फैलावर घेतलं. कामात कुठलीही हयगय नको अशी तंबी मुंडे यांनी अधिकाऱ्यांना दिली. पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर ध्वजारोहण पार पडल्यानंतर पोलीस परेड करत मानवंदना देण्यात आली. शालेय विद्यार्थ्यांसह बीडकरांनीही यावेळी मोठी गर्दी केली होती. मुंडे यांनी नागरिकांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देत जिल्ह्याच्या विकासकामात कधीही कमी पडणार नाही, अशी ग्वाही दिली.