मुंबई (वृत्तसंस्था) एकनाथ शिंदे यांनी बंड करून शिवसेना आमदारांच्या एका गटासह सुरत गाठले होते. त्यांच्यासोबत बाळापूरचे आमदार नितीन देशमुख होते. दरम्यान, नितीन देशमुख (Nitin Deshmukh) हे सूरतवरून थेट नागपुरात पोहचले आहे. मला हार्ट अॅटक आलाच नव्हता. जबरदस्तीने माझ्या दंडात इंक्जेक्शन टोचण्यात आलं. मी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहे असं नितीन देशमुख यांनी पत्रकारांना सांगितलं आहे.
शिवसेना नेते आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत पक्षाविरोधात बंड करून सुरतला गेलेल्या एका शिवसेना आमदार नितीन देशमुख यांची प्रकृती बिघडल्याची माहिती समोर आली होती. सुरतमध्ये दाखल झाल्यानंतर पहाटेच्या सुमारास आमदार नितीन देशमुख यांच्या अचानक छातीत दुखू लागले. त्यानंतर गंभीर अवस्थेत आमदार देशमुख यांनी सुरत येथील सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची बातमी समोर आली होती.
नितीन देशमुख यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांकडून देण्यात आली होती. आमदार देशमुख यांना रुग्णालयात दाखल करताच या परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. मात्र आता आमदार नितीन देशमुख हे नागपुरात दाखल झाले असून त्यांनी आपल्याला कोणताही हार्ट अॅटॅक आला नसल्याचं पत्रकारांना सांगितलं आहे.
इतकंच नाही तर, नितीन देशमुख यांनी मोठे खुलासे केले आहे. अॅटॅक आल्याचा बनाव करून मला जबरदस्तीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तेथे माझ्यावर कोणती तरी शस्त्रक्रिया करण्याचा डाव होता. अशा प्रकारचा गंभीर आरोप शिवसेना आमदार नितीन देशमुख यांनी केला आहे. त्यामुळे सूरतला गेलेले शिवसेनेचे आमदार खरचं दशहतमध्ये आहे का? अशी चर्चा संपूर्ण महाराष्ट्रात रंगली आहे.