कोल्हापूर (वृत्तसंस्था) माझ्यावर छत्रपतींचे संस्कार आहेत, मी मॅनेज होईल का? असा परखड सवाल संभाजीराजे छत्रपती यांनी टीकाकारांना उद्देशून उपस्थित केलाय. ते कोल्हापुरात मराठा संघटनांच्या समन्वयकांशी संवाद साधताना बोलत होते.
मराठा आरक्षणासाठी दोन आंदोलनं झाल्यावर संभाजीराजेंनी समाजातील सर्व घटकांना एका छत्राखाली आणण्याचे प्रयत्न सुरू केल्याचं चित्र दिसत आहे. मराठा समाजाला न्याय मिळावा, ही केवळ आपल्या एकट्याची भूमिका नसून छत्रपती शिवाजी महाराज आणि राजर्षी शाहू महाराज यांचीदेखील तीच भूमिका होती, असं ते म्हणाले. मराठा समाजाला आरक्षण मिळवून देणं, हे आपल्या आयुष्यातील एक महत्त्वाचं ध्येय आहे असं सांगत हे आंदोलन मॅनेज असल्याच्या चर्चांनाही त्यांनी उत्तर दिलं. मी छत्रपती आहे, मी कसा मॅनेज होईल, असा सवाल करतानाच त्यांनी सर्वांना परिस्थितीचं भान बाळगण्याचाही सल्ला दिला.
संभाजीराजे छत्रपती यांनी विनायक मेटे यांच्या टीकेला देखील उत्तर दिलं आहे. संभाजीराजे यांच्या मागण्या संपूर्ण राज्यासाठी आहेत. सारथी संस्थेचं उपकेंद्र केवळ कोल्हापुरात नाही, तर आठ ठिकाणी सुरू होणार आहे. त्यामुळे शिव-शाहू यांचे विचार हे केवळ कोल्हापूर पुरते मर्यादित नाहीत, संपूर्ण देशभर आहेत, असं प्रत्युत्तर विनायक मेटे यांना संभाजीराजेंनी दिलं आहे.
कोल्हापुरात काढण्यात आलेल्या ठोक मोर्चावरही त्यांनी पहिल्यांदाच भाष्य केलं आहे. आंदोलनं करा, मोर्चे काढा, पण आजूबाजूची परिस्थितीही बघा, असं आवाहन त्यांनी मोर्चेकऱ्यांना केलं. देश सध्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतून सावरत असून तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अशा परिस्थितीत गर्दी न करता आणि कोरोनाबाबतच्या नियमांचं कुठलंही उल्लंघन न करता आपला लढा चालू ठेवण्याचं मोठं आव्हान असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.