मुंबई (वृत्तसंस्था) बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचे पती राज कुंद्रा यांना अश्लील फिल्म बनवण्यासाठी सोमवारी रात्री अटक करण्यात आली आहे. पोलीस या प्रकरणाची चौकशी करत आहेत. दरम्यान, वादग्रस्त वक्तव्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या अभिनेत्री कंगना रनौतने यासंदर्भात आपली प्रतिक्रिया दिली आहे. बॉलिवूड एक गटर आहे असं म्हणत तिने राज कुंद्रावर निशाणा साधला आहे.
अभिनेत्री कंगना रनौतने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीतून आपला मुद्दा मांडला आहे. अभिनेत्रीने लिहिले आहे की, ‘यामुळेच मी फिल्म इंडस्ट्रीला गटार म्हणते, जे काही चमकते ते सगळेच सोने नसते.’ कंगनाने पुढे लिहिले की, ‘मी माझ्या आगामी टीकू वेड्स शेरू चित्रपटात बॉलिवूडचा पर्दाफाश करणार आहे, आम्हाला उद्योगात दृढ विश्वास प्रणाली आणि कडकपणा हवा आहे.’
बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती आणि उद्योजक राज कुंद्रा याला अश्लील चित्रपट रॅकेट प्रकरणात अटक करण्यात आली आहे. गुन्हे शाखेच्या माहितीनुसार राज कुंद्रा अश्लील चित्रपट तयार करण्यासाठी वित्त पुरवठा करत होता. अभिनेत्री गहना वशिष्ठला अश्लील चित्रपट रॅकेट प्रकरणात अटक झाल्यानंतर चौकशीचे धागेदोरे राज कुंद्रापर्यंत पोहोचले.