महोबा (वृत्तसंस्था) गावातील तरुणाने तिच्यावर बळजबरीने बलात्कार केला आणि तिचे न्यूड फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन तिला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. याच त्रासाला कंटाळून दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थिंनीने टोकाचं पाऊल उचललं. दोन पानी सुसाईड नोट लिहून तिने आत्महत्या केली. ही घटना उत्तर प्रदेशातील महोबा जिल्ह्यात घडली.
विद्यार्थिनीच्या मृत्यूने आता संपूर्ण गावात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी विद्यार्थींनीचा मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठवला आहे. तसेच या प्रकरणाचा अधिक तपासही सुरू केला आहे. कुटुंबीयांचे म्हणणे आहे की, त्यांच्या मुलीने खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केली. कुटुंबीयांनी जेव्हा मुलीला गळफास घेतलेल्या अवस्थेत पाहिलं तेव्हा त्यांनी तात्काळ शहर पोलिसांना याबाबतची माहिती दिली. घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी पंचनामा करुन मृतदेह तात्काळ खाली उतरविण्यात आला.
यावेळी पोलिसांना घटनास्थळावरून मृतदेहाजवळ एक सुसाईड नोट देखील सापडली आहे. ज्यामध्ये विद्यार्थिनीने बलात्कार आणि तिच्यासोबत आरोपीने न्यूड फोटो काढल्याचा आरोप केला आहे. पीडितेने दोन पानी सुसाईड नोटमध्ये गावातील एका तरुणावर बलात्कार आणि मोबाईलमधून न्यूड फोटो काढल्याचा आरोप केला आहे.
पीडितेचे आरोपीच्या कुटुंबावर अनेक गंभीर आरोप
पीडितेने आरोपीच्या नातेवाईकांवरही देखील गंभीर आरोप केले आहेत. यासोबतच सुसाईड नोटमध्ये आरोपीवर कठोर कारवाई करून त्याला फाशीची शिक्षा देण्यात यावी अशीही मागणी करण्यात आली आहे. दुसरीकडे या सगळ्या प्रकारामुळे मुलीच्या कुटुंबीयांची अवस्था बिकट झाली आहे. त्यामुळे आता पोलीस या प्रकरणाचा गांभीर्याने तपास करत आहेत.