जळगाव (प्रतिनिधी) महावितरणच्या जळगाव परिमंडलात श्री इब्राहीम अब्दुलकादिर मुलाणी हे नव्याने मुख्य अभियंता पदी आज सोमवार दि.1 जुलै रोजी रुजू झालेले आहेत. तत्कालीन महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ आणि आताच्या महावितरण मधील आजपर्यंतचा त्यांचा सेवाकाळ गौरवशाली राहीलेला आहे.
पेण मंडलातून ते पदोन्नतीवर मुख्य अभियंता म्हणून जळगावला रुजू झालेले आहेत. रुजू झाल्यानंतर जळगाव परिमंडलात विविध विद्युत कर्मचारी संघटना, अधिकारी-कर्मचारी आणि महावितरणशी संबंधतीत विविध घटकांनी त्यांचे स्वागत केले. इब्राहीम अब्दुलकादिर मुलाणी हे 1994 पासून त्यापुढील काही वर्ष पुर्वीच्या महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाच्या मुख्यालयात पारेषणच्या नियोजन विभागात कार्यरत राहिले. त्यानंतर सुमारे अकरा वर्षे ते महावितरणच्या महत्त्वाकांक्षी अशा एचव्हीडीएस प्रकल्प, 500 केव्ही पडघा येथे उभारणी, चाचणी, संचलन इत्यादी विविध क्षेत्रात अभियंता म्हणून महत्वपूर्ण काम केले. त्यांचा अनुभव व कार्यप्रणालीमुळे 2006 मध्ये त्यांची कार्यकारी अभियंता म्हणून निवड झाली.
कार्यकारी अभियंता या पदावर कार्यरत असतांना कुडाळ, सिंधदुर्ग, अलिबाग, रायगड अशा ठिकाणी पाच वर्ष त्यांना शहरी व ग्रामीण विद्युत यंत्रणेचा कामाचा अनुभव आहे. त्यापुढील पाच वर्ष त्यांनी महाविरणच्या मुख्यालयात पायाभूत आराखडा आयपीडीएस, एचव्हीडीस अशा विविध प्रकल्प नियोजन व त्यांच्या पूर्णत्वासाठी विशेष प्रयत्न केलेले आहेत. जळगाव परिमंडलात रुजू होण्याआधी ते रायगड जिल्ह्यात अधीक्षक अभियंता म्हणून कार्यरत होते. जळगाव परिमंडलात रुजू होताच विविध संघटनांकडून स्वागत स्वीकारतांना त्यांच्या प्रदीर्घ पूर्भानूभवांचा जळगाव परिमंडलास अधिकाधिक चांगल्या वीज सेवा देण्यास मदत होणार आहे. चांगल्या सेवेसाठी ते सदैव कटिबद्ध राहणार असल्याचे त्यांनी आश्वासित केले.