नवी दिल्ली (वृत्तसंस्था) यंदाच्या टी -20 विश्वचषकासाठी (T-20 World Cup) आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) वेळापत्रक जाहीर केले आहे. टी -20 विश्वचषकासाठी टीम इंडिया सज्ज झाली आहे. आयसीसीने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार भारत २३ ऑक्टोबरला मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर पाकिस्तानविरुद्ध पहिला सामना खेळणार आहे.
T20 विश्वचषक १६ ऑक्टोबरपासून सुरू होईल, तर अंतिम सामना १३ नोव्हेंबरला मेलबर्नमध्ये खेळवला जाईल. या स्पर्धेत ॲडलेड, ब्रिस्बेन, जिलॉन्ग, होबार्ट, मेलबर्न, पर्थ आणि सिडनी या ७ वेगवेगळ्या शहरांमध्ये एकूण ४५ सामने खेळवले जाणार आहेत. २०१४ चा चॅम्पियन श्रीलंका १६ ऑक्टोबर रोजी नामिबिया विरुद्ध स्पर्धेचा पहिला सामना खेळेल.
अंतिम सामना फ्लडलाइट्समध्ये खेळवला जाईल
विश्वचषकाचा पहिला उपांत्य सामना ९ नोव्हेंबरला सिडनीमध्ये आणि दुसरा १० नोव्हेंबरला ॲडलेड ओव्हलमध्ये खेळवला जाईल. ॲडलेड ओव्हलवर पहिल्यांदाच विश्वचषकाची उपांत्य फेरी होणार आहे. तर अंतिम सामना १३ नोव्हेंबरला मेलबर्न क्रिकेट मैदानावर होणार आहे. हा सामना फ्लडलाइट्समध्ये खेळवला जाईल.
मागील विश्वचषक ऑस्ट्रेलियाने जिंकला होता
शेवटचा T20 विश्वचषक २०२१ भारताने UAE आणि ओमानमध्ये आयोजित केला होता. ऑस्ट्रेलियाने हा विश्वचषक जिंकला. त्याने अंतिम फेरीत न्यूझीलंडचा पराभव केला.
भारत आणि पाकिस्तान एकाच ग्रुपमध्ये
पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका, बांगलादेश आणि दोन क्वालिफायर्ससह भारताला सुपर १२ मध्ये गट-२ मध्ये स्थान देण्यात आले आहे. संपूर्ण स्पर्धेत भारत एकूण ५ सामने खेळणार आहे. पहिला सामना २३ ऑक्टोबरला पाकिस्तानविरुद्ध, दुसरा २७ ऑक्टोबरला अ गटातील उपविजेत्यासोबत, तिसरा सामना ३० ऑक्टोबरला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध आणि संघ २ नोव्हेंबरला बांगलादेशसोबत चौथा सामना आणि ६ नोव्हेंबरला ब गटातील विजेत्यासोबत ५ वा सामना खेळेल.