मुंबई (वृत्तसंस्था) केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार या दोन नेत्यांमध्ये भेट झाल्याने राजकीय वातावरण ढवळून निघाले आहेत. यावरून राजकीय वर्तुळात तर्क-वितर्कांना उधाण आले आहे. आता शहा-पवार भेटीवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. संजय राऊत म्हणाले कि, एखादा मोठा नेता देशाच्या गृहमंत्र्यांना भेटतो, यात चुकीचे काय आहे. गृहमंत्र्यांना आम्ही देखील भेटू शकतो. कामानिमित्त भेट झाली असेल तर यात चुकीचे काहीच नाही.
राजकारणात कोणतीही बैठक गुप्त नसते. अनेक गोष्टी सार्वजनिक केल्या जात नाहीत. मात्र नंतर त्या सार्वजिनिक होतात, जसं की बंद खोलीतील चर्चा असो, असा टोला संजय राऊत यांनी अमित शाह यांना लगावला. जर देशाचे गृहमंत्री एखाद्या मोठ्या नेत्यासोबत बैठक घेत असतील तर त्याची माहिती त्यांनी नागरिकांना देणे आवश्यक आहे. याबद्दल जाणून घेणे नागरिकांचा हक्क आहे. काँग्रेस नेते संदीप दीक्षित यांना याबाबत विचारलं असता ते म्हणाले की, “गृहमंत्री एखाद्या मोठ्या नेत्याला भेटत असतील तर देशाला याची माहिती असायला हवी. दोन्ही नेत्यांमध्ये काय बातचित झाली हे देशाला कळायला हवं.”
दरम्यान, शरद पवार आणि प्रफुल्ल पटेल हे अहमदाबादमधून थेट मुंबईला आले. ते कोणालाही भेटले नाहीत. मात्र, आता एका गुजराती दैनिकात त्यांनी अमित शाह यांची भेट घेतल्याची बातमी आली आहे. हे भाजपचे षडयंत्र आहे. शरद पवार यांनी अमित शाह यांची भेट घेतल्याची बातमी निव्वळ अफवा आहे असं राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी म्हटलं आहे.