जळगाव (प्रतिनिधी) बिग बॉसमध्ये बोलावले तर ही सोन्यासारखी संधी आहे, मिळाली तर निश्चितपणाने जाऊ, असे राज्याचे पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी स्पष्ट केले आहे.
नुकतंच महेश मांजरेकरांना असा प्रश्न करण्यात आला होता, की राजकारणातील कोणकोणते चेहरे बिग बॉस मराठीच्या खेळात तुम्हाला पाहायला आवडतील. त्यावर उत्तर देताना मांजरेकर यांनी गुलाबराव पाटील यांचंही नाव घेतलं होतं. त्यानंतर जळगावातील एका कार्यक्रमात गुलाबराव पाटील यांनी बिग बॉसमध्ये बोलावलं तर नक्की जाऊ. बिग बॉसमध्ये जाण ही माझ्यासाठी सोन्यासारखी संधी असेल, असे गुलाबराव पाटील म्हणाले आहेत. गुलाबराव पाटलाला बिग बॉसमध्ये जर कोणी बोलवत असेल आणि अशी संधी मिळत असेल तर मला माझ्या मागच्या जीवनाची आठवण होतेय, असे सांगत लहानपणीच्या आठवणींना उजाळा दिला.
दरम्यान, राष्ट्रवादीचे विधान परिषद आमदार अमोल मिटकरी बिग बॉसमध्ये यायला पाहिजेत, मजा येईल, ते कडक बोलतात, असं महेश मांजरेकर म्हणाले होते. यासोबतच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटातील शिवसेना आमदार आणि फायरब्रँड नेते गुलाबराव पाटील यांची विनोदबुद्धी चांगली आहे. तसंच भाजप आमदार नितेश राणेंना बघायला आवडेल, ते एक मजा वेगळी आणतील. तसंच शिवसेना खासदार संजय राऊतही आवडले असते. ते वेगळा रंग आणतात, असंही मांजरेकर म्हणाले होते.