नवी दिल्ली (वृत्तसंस्था) नथुराम गोडसे हा खरा हिंदुत्ववादी असता तर त्याने महात्मा गांधी (Mahatma Gandhi) यांच्याऐवजी मोहम्मद अली जिन्नांवर गोळी झाडली असती. ते देशभक्तीचं काम झालं असतं’, असे वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केले.
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त पुन्हा एकदा हिंदुत्त्ववादाचा मुद्दा पुढे आला आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी गांधीजींच्या पुण्यतिथीनिमित्त श्रद्धांजली वाहिली आहे. राहुल गांधींनी ट्विटमध्ये म्हटलं आहे की, एका हिंदुत्त्ववाद्याने गांधीजींना गोळी मारली होती.सर्व हिंदुत्त्ववाद्यांना वाटतं की गांधीजी राहिले नाहीत. जिथं सत्य आहे तिथं आजही बापू जिवंत आहेत.’
राहुल गांधींनी केलेल्या ट्विट संदर्भात विचारण्यात आलेल्या प्रश्नावर संजय राऊत म्हणाले की, खरा हिंदुत्त्ववादी असता तर त्याने जिन्नांना गोळी मारली असती. गांधीजींना का गोळी मारली असती? पाकिस्तानची मागणी ही जिन्नांची मागणी होती. तुम्ही मर्द होतात. तुमच्याकडे मर्दानगी होती, तर पाकिस्तानची मागणी केल्यानंतर, ज्यांनी इथं हिंसाचार पसरवला, फाळणी केली त्यांना गोळी मारली असती. ते देशभक्तीचं काम असतं.
महात्मा गांधींची आज पुण्यतिथी आहे. देशभरातून त्यांना श्रद्धांजली वाहिली जात आहे. संजय राऊत म्हणाले की,’गांधीजींना गोळी मारणं, एका निशस्त्र, फकीराला गोळी मारणं योग्य नव्हतं. यामुळे जगाला दु:ख झालं आणि आजही आपण शोक व्यक्त करतो.’