मुंबई (वृत्तसंस्था) त्रिपुरा घटनेचे पडसाद सध्या महाराष्ट्राच्या काही शहरामध्ये पहायला मिळत आहे. काल दंगलसदृश्य स्थिती होती. ह्या सर्व घटनेच्या पाठीमागे रजा अकादमी असून तिच्यावर बंदी घाला, नाही तर महाराष्ट्राच्या भल्यासाठी आम्ही त्यांना संपवू असा इशाराच आता भाजप नेते आणि आमदार नितेश राणे यांनी ट्विट करत दिला आहे.
भाजप नेते नितेश राणे यांनी सकाळी ट्विट करत सरकार तसच रजा अकादमीला टार्गेट केलंय. ते ट्विटमध्ये म्हणतात- ‘महाराष्ट्राच्या विविध भागात जी हिंसा आणि दंगल उसळली त्याच्या पाठीमागे अतिरेकी संघटना रजा अकादमीच आहे. प्रत्येक वेळेस ते शांतता भंग करतात, सर्व नियम पायदळी तुडवतात आणि सरकार बसून राहतं, बघत बसतं. सरकारनं एक तर यांच्यावर बंदी घालावी अन्यथा, महाराष्ट्राच्या भल्यासाठी आम्ही त्यांना संपवू’.
दरम्यान, त्रिपुरामध्ये जमावानं मशिद पेटवल्याची अफवा महाराष्ट्रात पसरली. त्याच्या निषेधार्थ काल विविध ठिकाणी मुस्लिम मोर्चे काढले गेले. त्यात अमरावती, नांदेड, भिवंडीत जमाव हिंसक झाला. अमरावतीत तर जमावानं २०-२० दुकानं फोडली, दुचाकी तोडल्या. पोलीसांवर दगडफेक केली. बघता बघता महाराष्ट्राच्या काही शहरात दंगलसदृश्य स्थिती निर्माण झाली. भिवंडी-नांदेडमध्ये रजा अकादमीच्याच काही तरुणांनी कायदा हातात घेऊन दगडफेक केल्याचा आरोप आहे.
नेमकं काय आहे रजा अकादमी?
रजा अकादमीचं जेव्हा जेव्हा नाव निघतं तेव्हा तेव्हा मुंबईतल्या आझाद मैदानावर केलेली हिंसा डोळ्यासमोर येते. ही घटना होती. ११ ऑगस्ट २०१२ ची. आसाम आणि म्यानमारमध्ये झालेल्या मुस्लिमांवरच्या अत्याचाराच्या निषेधार्थ रजा अकादमीनं मुंबईतल्या आझाद मैदानावर धरणे धरले. पण बघता बघता जमाव हिंसक झाला आणि प्रचंड जाळपोळ, तोडफोड केली गेली. यात महिला पोलीसांवरही हात टाकल्याचे आरोप झाले. त्यानंतर रजा अकादमी दर काही काळानंतर मुस्लिमांच्या विविध प्रश्नावर अशीच आंदोलनं करते. आणि त्यातल्याच काही आंदोलन हिंसा उसळलीय. ह्या रजा अकादमीची स्थापना १९७८ साली अलहाज मोहम्मद सईद नुरी यांनी केलीय. मुस्लिम विचारवंतांची विशेषत: सुन्नी स्कॉलर्सची पुस्तकं प्रकाशित करण्याचं काम अकादमी करते. आतापर्यंत शेकडो पुस्तकं रजा अकादमीनं अरेबिक, हिंदी आणि इंग्लिशमध्ये प्रकाशित केलीत.