नवी दिल्ली (वृत्तसंस्था) अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला काल पुन्हा एकदा जामीन नकारण्यात आला. दरम्यान, आचार्य प्रमोद यांनी आपल्या व्हेरिफाइड ट्विटर हॅण्डलवरुन या प्रकरणासंदर्भात एक ट्विट केलंय. शाहरुखने भाजपामध्ये प्रवेश केल्यास मुलगा आर्यनला जामीन मिळण्याबरोबरच देशभक्त असल्याचं प्रमाणपत्रही शाहरुखला मिळेल असं आचार्य प्रमोद यांनी म्हटलंय.
आचार्य प्रमोद यांनी आपल्या व्हेरिफाइड ट्विटर हॅण्डलवरुन सकाळी ११ वाजून २० मिनिटांनी एक ट्विट केलं आहे. “शाहरुख खानने भाजपामध्ये प्रवेश घेतला पाहिजे. मुलाला जामीन मिळण्याबरोबरच त्याला देशभक्तीचं प्रमाणपत्रही मिळेल,” असं ट्विट त्यांनी केलंय. या ट्विटमध्ये त्यांनी शाहरुखला टॅगही केलं आहे. तसेच #AryanKhanBail हा हॅशटॅगही वापरलाय. शाहरुखने भाजपामध्ये प्रवेश घ्यावा असा सल्ला देणारं आचार्य प्रमोद यांचं ट्विट चांगलेच व्हायरल झाले आहे. काही तासांमध्ये १५०० हून अधिक जणांनी ते रिट्विट केलंय. तर ९ हजार ६०० हून अधिक जणांनी ते लाईक केलं आहे.
अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानचा काल पुन्हा एकदा जामीन नकारण्यात आला. सध्या मुंबईतील आर्थर रोड तुरुंगामध्ये असणाऱ्या आर्यन खानला न्यायालयाने दिलासा दिलेला नाही. आर्यन हा ३ ऑक्टोबरपासून तपास यंत्रणांच्या ताब्यात आहे. २ ऑक्टोबरच्या रात्री मुंबईच्या समुद्रात कॉर्डेलिया क्रूझवर नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो म्हणजेच एनसीबीने छापा टाकल्यानंतर त्याला अटक करण्यात आली होती.