बीड (वृत्तसंस्था) ऑनलाईन दसरा मेळावा घेणाऱ्या भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्यासह ४० ते ५० जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यानंतर पंकजा मुंडे यांनी याबाबत ट्विटरवर संताप व्यक्त केला आहे. “गुन्हे दाखल करण्याचं सत्र माझ्यापर्यंत आलं आहे,” असे ट्वीट पंकजा मुंडे यांनी केले आहे.
पंकजा मुंडे यांनी सावरगाव घाट इथे ऑनलाईन दसरा मेळावा घेतला होता. परंतु अमळनेर पोलीस स्टेशनमध्ये ४० ते ५० जणांविरोधात आपत्ती व्यवस्थापन कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पंकजा मुंडे यांच्यासह महादेव जानकर, खासदार भागवत कराड यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पंकजा मुंडे यांच्यासोबत उपस्थित असलेल्या लोकांनी कोणतंही सोशल डिस्टन्स पाळलं नाही. आपत्ती व्यवस्थापना संदर्भात घालून दिलेल्या नियमांचे पालन त्यांनी केले नाही, असा आरोप त्यांच्यावर आहे. परंतु याबाबत पंकजा मुंडे यांनी ट्विटरवर आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. त्या म्हणाल्या आहेत की, “अतिवृष्टी पाहणी केली, शेतकऱ्यांचे अश्रू पुसले, अनेक नेते दौऱ्यात अनेक जिल्ह्यात होते. परवानगी घेऊन दसऱ्याला भगवान बाबांच्या दर्शनासाठी गेले असता गुन्हा दाखल झाल्याची बातमी पहिली.कार्यकर्त्यांच्या नंतर हे गुन्हे दाखल करण्याचं सत्र माझ्यापर्यंत आलं तर…” असे ही त्या म्हणाल्या आहेत.
















