रत्नागिरी (वृत्तसंस्था) बारसूमधील लोकांना रिफायनरी नको असेल तर इथे रिफायनरी होता कामा नये, जर हुकूमशाहीने हा प्रकल्प लादण्याचा प्रयत्न केला तर महाराष्ट्र पेटवू”, अशी इशारा उद्धव ठाकरे यांनी शिंदे सरकारला दिला आहे.
गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या बारसू रिफायनरी प्रकल्पाच्या संदर्भात ग्रामस्थांची चर्चा करण्यासाठी उद्धव ठाकरे रत्नागिरी दौऱ्यावर आहेत. याच दरम्यान बारसू रिफायनरीच्या संदर्भात ग्रामस्थांची भावना जाणून घेत उद्धव ठाकरे यांनी कुठल्याही परिस्थितीत हा प्रकल्प होऊ देणार नाही अशी भूमिका घेत असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. उद्धव ठाकरे म्हणाले की, शिवसेना ही बारसूतील लोकांच्या पाठिशी आहे. जर येथील लोकांना रिफायनरी नको असेल तर काहीही झालं तरी इथे रिफायनरी होऊ देणार नाही.
मी मुख्यमंत्री असताना टाटा एअरबस, बल्कड्रग्ज पार्क असे अनेक प्रकल्प महाराष्ट्रात आणले होते. मात्र, हे सर्व प्रकल्प गुजरातला हलवण्यात आले आणि आता वादग्रस्त प्रकल्प महाराष्ट्राच्या माथी मारण्यात येत आहेत. त्यामुळे राख महाराष्ट्राला आणि रांगोळी गुजरातला असं मी होऊ देणार नाही. आज मी कोकणात ‘मन की बात’ करायला आलेलो नाही, तर ‘जन की बात’ ऐकायला आलो आहे, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.
दरम्यान, उद्धव ठाकरे आज रत्नागिरी दौऱ्यावर असून बारसू, सोलगाव, साखरकुंभे अशा गावांमध्ये उद्धव ठाकरे जात असून तेथील ग्रामस्थांच्या भावना ते जाणून घेत आहेत. यानंतर उद्धव ठाकरे यांची महाड येथे जाहीर सभा देखील होणार आहे. या सभेत उद्धव ठाकरे बारसू रिफायनरी प्रकल्पाच्या संदर्भात आपली भूमिका देखील स्पष्ट करणार आहे.