मुंबई (वृत्तसंस्था) अर्णव प्रकरणी दिल्लीत काय हालचाली सुरू होत्या हे सत्य मी जर मांडलं तर सर्वांना पळता भुई थोडी होईल, असा इशारा संजय राऊत यांनी दिला आहे. त्यामुळे अर्णव गोस्वामींना अटक केल्यानंतर दिल्लीत नेमकं काय घडलं? याबाबतचे तर्कवितर्क व्यक्त केले जात आहेत.
पत्रकार अर्णव गोस्वामी यांच्या अटकेच्या निषेधार्थ भाजपने केलेल्या आंदोलनावरून शिवसेना नेते संजय राऊत यांनी टीका केली आहे.
शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना अर्णव गोस्वामी यांच्या अटकेच्या मुद्द्यावरून भाजपला घेरले. गोस्वामींना पोलीस कोठडी ऐवजी न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे, अशी मागणी विरोधकांकडून केली जात आहे. त्याबाबत राऊत यांना विचारण्यात आलं. त्यावर मुख्यमंत्र्यांचा राजीनामा आणि गोस्वामींच्या न्यायालयीन कोठडीचा संबंध काय?, असा सवाल राऊत यांनी केला. अर्णव गोस्वामींसाठी काल भाजप रस्त्यावर उतरली होती. अर्णव त्यांचे कार्यकर्तेच असावेत अशा आविर्भावात हे आंदोलन सुरू होतं. भाजपचे बडे नेतेही प्रतिक्रिया देत होते. याप्रकरणी काल दिल्लीत पडद्यामागून नेमक्या काय हालचाली सुरू होत्या, हे सत्य मांडण्याचा प्रयत्न जर मी केला तर सर्वांची पळता भुई थोडी होईल, असा इशाराही त्यांनी दिला.
अर्णव त्यांचे कार्यकर्ते असल्याने एवढ्या मोठ्या प्रमाणावर कार्यकर्ते रस्त्यावर उतरले असतील. नाही तर ते रस्त्यावर उतरले नसते. कदाचित हा त्यांच्या पक्षाचा राष्ट्रीय कार्यक्रम असेल. असं मानायला पत्रकार तयार नाहीत. कारण हे प्रकरण पत्रकारितेशी संबंधित नसून आत्महत्येशी संबंधित आहे, असं ही त्यांनी सांगितलं.