जळगाव (प्रतिनिधी) केळी पीक विम्याच्या बाबतीत राज्य सरकारने केंद्राकडे वेळोवेळी पाठपुरावा केला आहे. पण केंद्राने सहकार्याची भूमिका दाखवली नाही. असे असताना हे लबाड लांडगे शेतकऱ्यांची दिशाभूल करत आहेत. तुमच्यात धमक असेल तर जाऊन मोदींना हलवा, त्यांना केळी पीक विम्याचे निकष पूर्वीप्रमाणे ठेवायला सांगा. केंद्राने केळी पीक विम्याचे निकष पूर्वीप्रमाणे ठेवले तर मी जाहीर व्यासपीठावर भाजपच्या नेत्यांचा सत्कार करेन, असे आव्हान राज्याचे पाणीपुरवठा मंत्री व शिवसेना प्रवक्ते गुलाबराव पाटील यांनी भाजपला दिले आहे.
आदिवासी तसेच शेतकऱ्यांच्या प्रलंबित असलेल्या विविध मागण्यांसाठी जळगावात लोकसंघर्ष मोर्चा संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन सुरू आहे. या आंदोलनकर्त्यांची शुक्रवारी गुलाबराव पाटील यांनी भेट घेतली. यावेळी आंदोलकांच्या मागण्या जाणून घेतल्यानंतर भाषण करताना गुलाबराव पाटील यांनी भाजप नेत्यांच्या आरोपांचा समाचार घेतला. यावेळी गुलाबराव पाटील पुढे म्हणाले की, जळगाव लोकसभा मतदारसंघाचे खासदार उन्मेष पाटील यांनी केळी पीक विम्याच्या विषयावरून राज्य सरकारवर टीका केली आहे. उन्मेष पाटील यांनी ‘शिंगाडा मोर्चा काढणारे आता सोंगाडे झाले आहेत’, अशा शब्दांत माझ्यावर टीका केली. मात्र, उन्मेष पाटील यांना माहिती नाही. मी खेड्यातला सोंगाड्या आहे. सोंगाड्या हा तमाशात नाचणाऱ्या नाच्यांना नाचवत असतो. मी ठरवले तर या नाच्याला कधीही नाचवू शकतो. भाजप नेत्यांचे हे आरोप म्हणजे ‘उलटा चोर कोतवाल को डाँटे’, असा प्रकार असल्याचेही ते म्हणाले.