पाटणा (वृत्तसंस्था) केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्यांविरोधात पंजाब आणि हरियाणाचे शेतकरी हजारोंच्या संख्येने दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करत आहेत. या शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ तेजस्वी यादव यांनी देखील बिहारमध्ये आंदोलन पुकारलं. त्यांनी सरकारविरोधात निदर्शने दिली. त्यामुळे त्यांच्याविरोधात FIR दाखल करण्यात आला आहे. तुमच्यात हिम्मत असेल तर अटक करुन दाखवा, असं खुलं आव्हान तेजस्वी यादव यांनी बिहार सरकारला दिलं आहे.
दिल्ली सीमेवर सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनावरुन बिहारमधील राजकारण प्रचंड तापलं आहे. शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ बिहारमध्ये आंदोलन पुकारलं म्हणून राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांच्यावर FIR दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे तेजस्वी यादव यांनी नितीश कुमार सरकारवर निशाणा साधला आहे. तुमच्यात हिम्मत असेल तर अटक करुन दाखवा, त्यानंतर तेजस्वी यादव यांनी नितीश कुमार सरकारवर ट्विटरवर सडकून टीका केली. “घाबरट मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखालील सरकारने शेतकऱ्यांच्या विरोधात आवाज उठवल्याबद्दल आमच्याविरोधात FIR दाखल केला. तुमच्यात दम असेल तर मला अटक करा. मी वाट पाहिन. नाही केलं तर मी स्वत: हून अटक होईन. शेतकऱ्यांसाठी FIR काय फाशीदेखील द्यायची असेल तर द्या”, असा घणाघात तेजस्वी यादव यांनी केला. शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ तेजस्वी यादव यांनी महागठबंधनच्या सर्व पक्षांसोबत पाटणातील गांधी मैदानात आंदोलन केलं. यावेळी सरकारविरोधात आणि शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ निदर्शने देण्यात आली. याच आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर तेजस्वी यादव यांच्याविरोधात FIR दाखल करण्यात आला.