मुंबई (वृत्तसंस्था) कॅबिनेटच्या आजच्या बैठकीत १८ ते ४४ वर्षांवरील नागरिकांच्या लसीकरणाला तूर्त स्थगिती देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी हा निर्णय जाहीर केला आहे.
राजेश टोपे म्हणाले, “तुर्त महाराष्ट्रात १८-४४ वयोगटातील लसीकरण आपण स्थगित करत आहोत. सीरमचे प्रमुख अदर पुनावाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटले. त्यांनी २० मे नंतर महाराष्ट्राला दर महिन्याला दीड कोटी डोसेस देऊ असं सांगितलंय. त्याची विगतवारी कशी करायची याबाबत ते लंडनहून भारतात आल्यावर निर्णय घेतील. ४-५ दिवसानंतर अधिक प्रमाणात लस उपलब्ध झाली की पहिल्या डोसचा निर्णय घेवू,”
“४५ वरील व्यक्तींना दुसरा डोस भारत सरकार देवू शकत नाही. त्यामुळं दुसरा डोस देणं गरजेचं आहे. असं असल्यानं महाराष्ट्र सरकारने खरेदी केलेली लस ही ४५ वर्षांवरील लोकांना दिली जाणार आहे. दुसऱ्या डोससाठी २० लाख डोस हवेत. सध्या केवळ १० लाख आहेत. पहिल्या डोसची लगेच अपेक्षा करू नये,” असंही राजेश टोपे यांनी नमूद केलं.
राजेश टोपे म्हणाले, “लॉकडाऊन दरम्यान कोरोना रुग्णसंख्या कमी झाली. लॉकडाऊन केल्यानंतर कोरोना रुग्णांची संख्या ७ लाखांवरून ४ लाख ७५ हजारवर आलीय. महाराष्ट्राच्या रुग्णवाढीचा दर भारताच्या रुग्णवाढीच्या दराच्या निम्मा आहे. त्यामुळे ही संख्या आणखी कमी करण्यासाठी राज्यात लॉकडाऊन ३१ मे पर्यंत वाढवण्याची एकमताने मागणी बैठकीत झाली. याबाबत मुख्यमंत्री अंतिम निर्णय घेतील. सीरम जेव्हा लस देईल तेव्हा १८ ते ४४ गटातील नागरिकांना लस दिली जाईल,” असंही राजेश टोपे यांनी नमूद केलं.