नवी दिल्ली (वृत्तसंस्था) बऱ्याच राज्यांनी अनलॉकच्या दिशेने वाटचाल केली आहे. त्यात केंद्र सरकारने राज्यांना सावधानता बाळगण्याचा इशारा दिला आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर येत्या १६ जुलै रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात महत्त्वाची चर्चा होईल. व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे होणाऱ्या या बैठकीत कोरोनाच्या परिस्थितीचा आढावा घेतला जाईल.
देशातील ६ राज्यातील मुख्यमंत्र्यांसोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी संवाद साधणार आहेत. या बैठकीत उद्धव ठाकरे यांच्यासोबतच तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम के स्टॅलिन, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वाय एस जगन मोहन रेड्डी, कर्नाटकचे मुख्यमंत्री बी एस येडियुरप्पा, ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक तसंच केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन हेदेखील सहभागी होणार आहेत.
देशात कोरोना संक्रमणाच्या तिसऱ्या लाटेच्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर आपल्याला अधिक सतर्क राहण्याची गरज असल्याचं वक्तव्य आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं. मायक्रो कन्टेन्मेंट झोन बनवण्यात यावेत तसंच जबाबदारीही निश्चित करण्यात यावी, अशा सूचनाही पंतप्रधानांनी दिल्यात.
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेशी मुकाबला करण्यासाठी महाराष्ट्र तयार
कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा मुकाबला करण्यासाठी ऑक्सिजन उत्पादन, साठा यांचे नियोजन तसेच उद्योगांतील कामगार- कर्मचारी यांचे मोठ्या प्रमाणावर लसीकरण, निर्बंध कडक करावे लागले तरी आर्थिक चक्र सुरू ठेवणे, उत्पादनावर परिणाम होऊ न देणे, कामगारांची कंपनीच्या परिसरातील तात्पुरती फिल्ड निवास व्यवस्था, कामाच्या वेळा, कोविड प्रादुर्भाव होऊ न देणारी व्यवस्था (बायो बबल) यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी प्रशासनाला तयार राहण्याचे निर्देश दिले आहेत.