चाळीसगाव (प्रतिनिधी) आपल्या चाळीसगाव पंचक्रोशीला पंढरपुरच्या वारीची अशी मोठी परंपरा आहे. टिळक चौकातील तीनशे वर्षापूर्वीचे विठ्ठल मंदीर, या परंपरेचे प्रतिक म्हणता येईल. वै. ह.भ.प. मोतीराम महाराज यांनी पंढरपुर वारीचा पाया रचला तर बेलदारवाडी येथील सिद्धेश्वर आश्रमाचे प्रमुख ह.भ.प. १००८ महामंडलेश्वर ज्ञानेश्वर माऊली यांनी यावर कळस चढविला.
गावोगावी अलंकापुरीची वारी करणारे असंख्य कुटूंबे, परिवार आहे. वारकरी कुटुंबाचा वारसा असणारें आमदार मंगेश चव्हाण यांनी २०१९ पासून चाळीसगाव मतदारसंघातील हजारो वारकऱ्यांसाठी “भक्ती जेष्ठांची… वारी पंढरीची” हा अभिनव उपक्रम सुरु केला. परिस्थितीमुळे असो की वेळेमुळे असो ज्यांना पंढरीची वारी शक्य नाही अश्या भाविकांना मोफत प्रवास, जेवण, निवास व्यवस्था आदींच्या माध्यमातून पंढरीचे दर्शन घडविले जाते, २०१९ पासून कोविड काळातील खंड वगळता दरवर्षी २५०० हून अधिक भाविकांना आमदार मंगेश चव्हाण पंढरपूर नेत आहेत.
यावर्षी देखील मंगळवार दि.२० जून रोजी विशेष रेल्वे ने २५०० भाविकांना पंढरपूर नेण्याचे त्यांचे नियोजन आहे. त्यासाठी पंढरपूर वारी नियोजन समिती, भारतीय जनता पार्टी व शिवनेरी फाउंडेशन चे पदाधिकारी परिश्रम घेत आहेत. चाळीसगाव तालुक्यातील हजारो वारकऱ्यांच्या नामघोषात यावर्षीही पंढरी दुमदुमणार आहे.
असा असेल पंढरपूर वारीचा प्रवास
मंगळवार दि.२० जून २०२३.
सायंकाळी ५ वा – छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे मा.आमदार मंगेशदादा चव्हाण व वारकऱ्यांच्या उपस्थितीत पालखी पूजन व पालखीचे चाळीसगाव रेल्वेस्टेशन कडे प्रस्थान
रात्री ७ वा. चाळीसगाव रेल्वे स्टेशन येथून विशेष ट्रेन ने वारीला सुरुवात
बुधवार दि.२१ जून २०२३
सकाळी ६ वा. – पंढरपूर रेल्वे स्टेशन येथे विशेष ट्रेनचे आगमन व पायी चालत श्री.शनि महाराज संस्थान मठ, सांगोला रोड, पंढरपूर कडे प्रस्थान
सकाळी १० ते संध्या.४ वा. – सवडीनुसार चंद्रभागा स्नान, श्री विठ्ठल रुख्मिणी दर्शन
सायंकाळी ४ वा. – श्री शनि महाराज मठ येथे सामूहिक हरिपाठ व आमदार मंगेशदादा चव्हाण यांचा वारकऱ्यांशी संवाद
रात्री ७ वाजता – श्री शनि महाराज मठ येथून पंढरपूर रेल्वे स्टेशन कडे पायी चालत प्रस्थान व विशेष ट्रेन ने परतीच्या प्रवासाला सुरुवात
(दि.२१ जून रोजी वारकऱ्यांसाठी जेवणाची वेळ – सकाळी ८ ते दुपारी १२ तसेच सायंकाळी ५ ते ७ वाजेपर्यंत श्री शनि महाराज संस्थान मठ, सांगोला रोड, पंढरपूर येथे राहील)
पंढरपूर येथे अडचण आल्यास पुढील क्रमाकांशी संपर्क साधावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे. (९७६७५५५५४४ / ९९२२३६००६६)
हजारो वारकऱ्याना पंढरीचे दर्शन हा माझ्यासाठी पांडुरंगाचाच आशिर्वाद – आमदार मंगेश चव्हाण !
पंढरपूर वारीची पालखी २०१९ मध्ये मी पहिल्यांदा खांद्यावर घेतली. २३०० ज्येष्ठ नागरिकांना लक्झरी बसव्दारे पंढरपुरात नेले. विठूरायाच्या दर्शनाने ते सुखावले. पांडुरंगांच्या आशिर्वादाने माझ्यासाठी विधानसभेचे दरवाजे उघडले गेले. सर्वसामान्य कष्टकरी, वारक-याचा मुलगा आमदार झाला. गेल्या वर्षी देखील ज्येष्ठांच्या शारिरीक व्याधी लक्षात घेऊन २४ डबे असणा-या विशेष रेल्वेने ‘चाळीसगाव ते पंढरपूर’ आयोजित केली होती. त्यांच्या प्रवासासोबतच चहा, नाश्ता, जेवण, पिण्याचे पाणी, वैद्यकीय सुविधा आदी उपलब्ध करून दिल्या जातात. यावर्षीदेखील २५०० वारकरी मायबापांना पंढरीचे दर्शन घडविण्याचा माझा मनोदय असल्याची प्रतिक्रिया आमदार मंगेश चव्हाण यांनी दिली.