अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील दहिवद येथे अज्ञात चोरट्यांनी भरदिवसा पाच घरांचे कुलूप उघडून एकूण सात लाख १९ हजार २०० रुपयांची रोख रक्कम व सोन्याचे दागिने चोरून नेल्याची घटना २६ रोजी सकाळी ८ ते सायंकाळी ६ वाजेदरम्यान घडली. ग्रामीण भागातील शेतकरी घराच्या किल्ल्या बाहेरच कोठेतरी ठेवून जातात, याच संधीचा गैरफायदा घेत चोरट्यानी घरे न फोडता ती उघडून या चोऱ्या केल्या आहेत.
यात केतन ताथू माळी हे २६ रोजी सकाळी ८ वाजता शेतात कामाला निघून गेले. त्यांनी घराची किल्ली बाहेर सरई वर ठेवली होती. सायंकाळी ६ वाजता घरी परतल्यावर त्यांना घर उघडे दिसले. तसेच घरातील कोठीत ठेवलेले पैसे आणि सोन्याचे दागिने दिसले नाहीत. त्याचप्रमाणे गावातील आणखी ४ घरे उघडून चोरट्यांनी चोऱ्या केल्याचे समजले.
दरम्यान, यात केतन माळी यांच्या घरातून ३ लाख २५ हजार रुपये रोख, २२ हजार ५०० रुपयांचे ७ ग्रॅम सोन्याचे झुबे, २१ हजारांचे ७ ग्रॅम झुबे, ९ हजारांचे ३ ग्रॅम सोन्याचे दागिने, ६ हजारांचे २ ग्रॅम सोने, ४ हजार ४०० रुपयांचे ११ तोळे चांदी, ४ हजारांचे १० तोळे चांदी, २ हजारांचे ५ तोळे चांदीचे वाळे, १२०० रुपयांचे ३ तोळे चांदीचे कडे असा एकूण ३ लाख ९५ हजारांचा ऐवज चोरून नेला. तर हरीलाल तापीराम माळी यांच्या घरातून ५० हजार रुपये रोख, ३६ हजारांचे १२ ग्रॅम सोन्याचे झुबे, ३० हजारांचे १० ग्रॅम सोन्याच्या अंगठ्या, १८ अंगठ्या, हजारांच्या ६ ग्रॅम वजनाच्या २ अंगठ्या, १६०० रुपयांची चांदी, २ हजारांच्या चांदीचे वाळे असा १ लाख ३७ हजारांचा ऐवज, तसेच राजेंद्र शंकर पाटील यांच्या घरातून ९० हजारांची ३० ग्रॅम सोन्याची माळ, ५१ हजाराची १७ ग्रॅम सोन्याची मिनीमाळ, १८ हजाराचे ६ ग्रॅम सोन्याचे झुबे, १२ हजाराचे ४ ग्रॅम सोन्याच्या अंगठ्या, १५०० सोन्याचे दागिने असे एकूण १ लाख ७२ हजारांचे दागिने चोरून नेले.
अविनाश सैतान माळी यांच्या घरातून ६ हजारांचे सोन्याचे दागिने, राजेंद्र रुपचंद पाटील यांच्या घरातून ८ हजार रुपये रोख असा एकूण ३ लाख ८३ हजार रूपये रोख, ३ लाख २१ हजारांचे १०९ ग्रॅम सोन्याचे दागिने व १५ हजार २०० रुपयाची ३४ तोळे चांदी असा एकूण। ७ लाख १९ हजार २०० रुपयांचा ऐवज चोरीस गेला आहे. या प्रकरणी अमळनेर पोलीस ठाण्यात केतन माळी याच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक भगवान शिरसाठ करत आहेत.
दरम्यान, घटनास्थळी सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र पिंगळे, पोलीस उपनिरीक्षक भगवान शिरसाठ, हेडकॉन्स्टेबल संदेश पाटील, उज्ज्वल म्हस्के, प्रशांत पाटील, एलसीबीचे संदीप पाटील, राहुल कोळी व ठसे तज्ज्ञांनी भेटी देऊन पंचनामे केले. तसेच श्वान पथकालाही पाचारण करण्यात आले होते. दरम्यान, या पाचही घर मालकांनी आपल्या घराच्या चाव्या घरच्या बाहेर टांगलेल्या किंवा घराबाहेरच कोठेतरी ठेवलेल्या होत्या. चोरट्यांना ग्रामीण संस्कृतीचा अभ्यास असल्याने त्यांनी ही संधी साधली असावी, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.