चोपडा (प्रतिनिधी) भारत सरकारच्या युवा कार्यक्रम आणि क्रिडा मंत्रालयांतर्गत स्वायत्त संस्था नेहरू युवा केंद्र जळगाव अंतर्गत धानोरा (ता. चोपडा) गावातील सावित्रीबाई फुले युवती मंडळ, कै.झि.तो.महाजन माध्यमिक विद्यालय व श्री.ना.भा.पाटील ज्युनियर कॉलेज, धानोरा यांच्या संयुक्त विद्यमाने ‘बाल विवाह मुक्त जनजागृती अभियान’ अंतर्गत विवीध कार्यक्रम उत्साहात संपन्न झाले.
युनिसेफ व एस.बी.सी – 3 सक्षम प्रकल्प यांच्या मार्गदर्शनातून जिल्ह्याभरात बाल विवाह मुक्त जनजागृती अभियान राबविण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर दि.८ डिसेंबर रोजी धानोरा विद्यालयाच्या प्रांगणावर कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमात नेहरू युवा केंद्राचे तालुका समन्वयक अनिल बाविस्कर यांनी बालविवाह कायद्यातील तरतुदी, बालविवाहाची कारणे व त्यावरील उपाय यांची माहीती देवून बालविवाहाचे निर्मूलन करणे विषयी जनजागृतीपर मार्गदर्शन केले व विद्यार्थ्यांच्या विवीध शंकांचे त्यांनी उत्तरे देऊन निरसण केले.
यानंतर नेहरू युवा केंद्राचे तालुका समन्वयक श्री.परेश पवार व युवती मंडळाच्या अध्यक्षा कु.कल्याणी महाजन यांनी शाळेतील मुला – मुलींसाठी लिंगभाव समानतेवर आधारित विवीध खेळांचे आयोजन केले होते. यात धान्य व दाळी निवडणे, पुस्तकाला कव्हर लावणे व पैसे / नोटा मोजणे आदी खेळांत विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला व यातून प्रत्यक्षपणे विद्यार्थ्यांमध्ये स्त्री – पुरूष समानतेची भावना रूजल्याचे दिसून आले.
यावेळी व्यासपीठावर प्राचार्य के.एन.जमादार, पर्यवेक्षक एन.पी.महाजन आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमासाठी नेहरू युवा केंद्राचे जिल्हा युवा अधिकारी श्री.नरेंद्र डागर सर यांचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित सर्वांनी बालविवाह प्रतिबंधक प्रतिज्ञा घेवुन बालविवाह निर्मूलन करण्याचे ठरविले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व्ही.डी.कोष्टी यांनी केले. तर आभार व्ही.एस.महाजन यांनी मानले. यावेळी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.