पाचोरा (प्रतिनिधी) वृद्धाचे हात-पाय बांधून आणि चाकूचा धाक दाखवून ३ लाखांच्या रोकडसह सोन्याचे दागिने घेऊन दरोडेखोराने पळ काढला. ही थरारक घटना दुसखेडा (ता. पाचोरा) येथे गुरुवारी दुपारी एक वाजता घडली.
दुसखेडा येथील एकनाथ पांडू पाटील (वय ८८) हे गुरुवारी दुपारी घरी एकटेच होते. घरातील महिला शेजारी पापड करण्यासाठी गेल्या होत्या. त्याचवेळी एक दरोडेखोर चाकू घेऊन घरात शिरला. त्याने पाटील यांच्या तोंडात बोळा कोंबला आणि त्यांचे हात-पाय बांधून कपाटाजवळ घेऊन गेला. चोरट्याने कपाटात ठेवलेली ३ लाख १० हजारांची रोकड व सोन्याचे दागिने यात सोन्याची बिस्किटे, तुकडा, मंगळसूत्र, चपलाहार, सोन्याच्या बांगड्या आदी वस्तू नेल्या. नातवाच्या लग्नासाठी या वस्तू त्यांनी जमा करून ठेवल्या होत्या. घरी कोणी नाही, ही संधी साधत दरोडेखोराने अवघ्या वीस मिनिटात हात साफ करीत पळ काढला. यावेळी वृद्धानेच कशीबशी सुटका करीत दरवाजा उघडला, तोपर्यंत दरोडेखोर पसार झाला होता. याप्रकरणी पाचोरा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.