जळगाव (प्रतिनिधी) शासनाच्या पशुस्वास्थ व पशुरोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत पशुवैद्यकीय संस्थांची बांधकामे व बळकटीकरण करणे या योजनेतून राज्यासाठी पहिल्या टप्प्यात ८० फिरत्या पशुचिकित्सा पथकांची स्थापना करण्यास शासनाने मान्यता दिली असून यात जळगाव जिल्ह्यातील धरणगाव, एरंडोल, भुसावळ, जामनेर व चाळीसगाव या तालुक्यांचा समावेश करण्यात आलेला आहे. पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी याबाबत पाठपुरावा केला होता. त्यामुळे जिल्ह्यातील पशुधनासाठी तात्काळ उपचारासाठी या फिरत्या पशुचिकित्सापथकांची मदत होणार असल्याने पशुपालकांना मोठा दिलासा मिळणार आहे. या माध्यमातून ‘पशुपालकांच्या दारी’ अद्ययावत पशुवैद्यकीय सेवा पुरविण्यात येणार आहे.
राज्यातील शेतकरी आणि गुरे-ढोरे यांचे अतूट नाते होय. मानवाप्रमाणेच पशुंना देखील विकार होत असल्याने त्यांच्या उपचारासाठी पशुवैद्यकतज्ज्ञांना पाचारण करावे लागते. राज्यातील प्रत्येक तालुक्यासह महत्वाच्या गावांमध्ये पशुवैद्यकीय सेवा उपलब्ध असली तरी अनेकदा गुरांना तात्काळ वैद्यकीय सेवेची आवश्यकता असते, नेमकी हीच समस्या लक्षात घेऊन राज्य सरकारने फिरत्या पशुवैद्यकीय दवाखान्यांना प्रशासकीय मान्यता प्रदान केली आहे.
केंद्र सरकारच्या पशुस्वास्थ व रोग नियंत्रण ( LH& DC) अंतर्गत पशुवैद्यकीय संस्थांची बांधकामे व बळटीकरण करणे या योजनेतून ८० फिरत्या पशुचिकित्सा पथकांना शासनाने प्रशासकीय मान्यता दिली असून आज शासन निर्णय देखिल जाहीर केलाआहे. यात जिल्ह्यातील धरणगाव, एरंडोल, भुसावळ, चाळीसगाव व जामनेर या तालुक्यांचा समावेश आहे. यामुळे या तालुक्यांमध्ये आता फिरता पशुवैद्यकीय दवाखाना कार्यरत होणार आहे.
एका क्रमांकावरून मिळणार मदत !
या योजनेच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेल्या फिरत्या पशुवैद्यकीय दवाखान्याची सेवा घेण्यासाठी १९६२ या टोल-फ्री क्रमांकावर कॉल करावा लागणार आहे. या फिरत्या दवाखान्यात तात्काळ उपचारासाठी आवश्यक असणारी सर्व उपकरणे तसेच प्रशिक्षित कर्मचार्यांचा समावेश असणार आहे. एका फिरत्या दवाखान्याचे कार्यक्षेत्र हे संपूर्ण तालुक्याचे असेल. एखाद्या पशुपालकाला आपल्या गुराच्या उपचारासाठी याची मदत हवी असल्यास त्याला १९६२ क्रमांकावर कॉल करावा लागेल. याबाबतची माहिती राज्यस्तरीय कॉल सेंटरमध्ये जाणून येथून संबंधीत फिरत्या दवाखान्यातील कर्मचार्यांना तात्काळ मोबाईल कॉल व एसएमएसच्या माध्यमातून याची माहिती दिली जाईल. यानंतर सदर फिरता दवाखाना त्या पशुपालकाच्या घरी जाऊन त्याच्या गुरावर उपचार करेल. फिरत्या दवाखान्यासाठी वापरण्यात येणार्या वाहनांचा शासनाच्या विविध योजनांच्या जनजागृती साठी देखील उपयोग होणार आहे. सध्या कार्यरत असलेल्या सर्व पशुवैद्यकीय दवाखान्यांच्या मदतीला हे फिरते पथक उपलब्ध करण्यात येणार आहे. ज्या तालुक्यात फिरता दवाखाना नाही तेथील पशुपालक देखील सदर टोल-फ्री क्रमांकावर कॉल करून शकतात. येथून त्यांना त्यांच्या तालुक्यात उपलब्ध असलेल्या नजीकच्या पशुवैद्यकीय चिकित्सा केंद्राबाबत माहिती व सल्ला देण्यात येणार आहे.
पशुपालकांना होणार लाभ !
पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या पुढाकाराने जळगाव नजीकच्या लांडोरखोरी उद्यानात अतिशय अद्ययावत असे प्राणी चिकित्सा केंद्र उभारण्यात येत आहे. याच धर्तीवर आता पाच तालुक्यांमध्ये पशुंसाठी फिरता दवाखाना उपलब्ध झाल्याने हजारो पशुपालकांना याचा लाभ होणार आहे. यातून अनेक गुरांचे प्राण वाचणार असून अर्थातच शेतकर्यांना बसणारा आर्थिक फटका वाचणार आहे.
पालकमंत्र्यांनी मानले आभार
पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी पाठपुरावा केल्याने जिल्ह्यात पाच तालुक्यांना आता फिरते पशुवैद्यकीय रूग्णालये मिळणार आहे. यांना मंजुरी मिळाल्याने त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजितदादा पवार तसेच पशुसंवर्धन मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील व सर्व सहकारी मंत्री महोदय यांचे आभार मानले आहेत. जिल्ह्यातील पशुपालकांच्या सेवेत लवकरच हे फिरते दवाखाने रूजू होणार असल्याची माहिती देखील त्यांनी दिली आहे.