जळगाव (प्रतिनिधी) जिल्ह्यातील कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्यावतीने राबविण्यात येत असलेल्या विविध उपाययोजनांमुळे जिल्ह्यात आतापर्यंत आढळून आलेल्या बाधित रुग्णांपैकी ९४ टक्के रुग्ण बरे होऊन सुखरुप घरी गेल्याची माहिती जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिली आहे.
मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येत असलेली माझे कुटूंब, माझी जबाबदारी मोहिम जिल्ह्यात राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. यासाठी जिल्ह्यातील सर्व प्रशासकीय यंत्रणांसोबतच आरोग्य विभागाचे कर्मचारी, आशा कार्यकर्त्या व आंगणवाडी सेविकाही घरोघरी जाऊन नागरीकांची तपासणी करीत आहे.
जिल्ह्यात आज (19 ऑक्टोबर) रोजी 169 रुग्ण बरे होऊन घरी गेले असून आतापर्यंत 48 हजार 935 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 94.03 टक्क्यांवर पोहोचले आहे. जिल्ह्यात सध्या 1 हजार 862 ॲक्टीव्ह रुग्ण विविध रुग्णालयात उपचार घेत असून पैकी 1 हजार 255 रुग्ण हे गृह अलगीकरणात आहेत. सध्या उपचार घेत असलेल्या रुग्णांपैकी 1 हजार 403 रुग्ण हे लक्षणे नसलेले तर अवघे 459 रुग्ण हे लक्षणे असलेले असून यापैकी 189 रुग्णांना ऑक्सिजन वायु सुरु आहेत तर 74 रुग्ण आयसीयुमध्ये दाखल आहेत. कोविड केअर सेंटरमध्ये 147 रुग्ण, डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटरमध्ये 256, डेडिकेटेड कोविड हॉस्पिटलमध्ये 203 रुग्ण उपचार घेत आहेत. तर विलगीकरण कक्षात 202 रुग्ण आहेत. जिल्ह्यात माझे कुटूंब, माझी जबाबदारी मोहिम अतिशय प्रभावीपणे राबविण्यात येऊन मोठ्या प्रमाणात कोमॉर्बिड रुग्ण शोधण्यात आले. तसेच त्यांची त्वरीत तपासणी करुन त्यांचेवर उपचार करण्यात आल्याने गेल्या महिन्याभरापासून जिल्हृयात सलगपणे बाधित रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढली असून उपचार घेणाऱ्या ॲक्टीव्ह रुग्णांची संख्या कमी झाली ही जिल्ह्यासाठी समाधानाची बाब आहे.
जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पालकमंत्र्यांच्या आवाहनाला लोकप्रतिनिधी, सामाजिक संस्था, संघटना, सर्व राजकीय पक्षांचे कार्यकर्ते, दानशूर व्यक्ती यांनी उत्सफुर्तेपणे प्रतिसाद दिल्याने जिल्ह्याच्या प्रत्येक तालुक्यात ऑक्सिजनयुक्त बेड तयार झाले आहेत. सद्य:परिस्थितीमध्ये जिल्ह्यात 12 हजार 854 बेड असून त्यापैकी 2 हजार 19 ऑक्सिजनयुक्त बेड असून 322 आयसीयु बेडचा समावेश आहे. माझे कुटूंब, माझी जबाबदारी मोहिमेतंर्गत आढळून आलेल्या कोरोना संशयितांना लक्षणे जाणवताच त्यांची तपासणी करण्यात येत आहे. तसेच आवश्यकता भासल्यास त्यांचे स्वॅबही तपासणीसाठी घेण्यात येत आहे. जिल्ह्यात आतापर्यंत आरटी-पीसीआरद्वारे 1 लाख 4 हजार 840 तर रॅपिड ॲन्टीजेन टेस्टद्वारे 1 लाख 36 हजार 63 अशा एकूण 2 लाख 40 हजार 903 कोरोना संशयितांच्या तपासण्या करण्यात आल्या आहेत. यापैकी 1 लाख 87 हजार 613 चाचण्या निगेटिव्ह तर 52 हजार 41 चाचण्या पॉझिटिव्ह आल्या असून इतर अहवालांची संख्या 1 हजार 123 असून अवघे 126 तपासणी अहवाल प्रलंबित आहेत. जिल्ह्यात एका दिवसात 3 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला असून आतापर्यंत 1 हजार 244 रुग्णांचा मृत्यु झाला आहे. जिल्ह्यात एकूण मृत्यु झालेल्या व्यक्तींपैकी 1 हजार 92 रुग्ण हे 50 वर्षा पेक्षा अधिक वयोगटातील असून 561 रुग्ण हे आजारपण (कोमॉर्बिड) असलेले आहेत. बाधित रुग्णांना आवश्यक ते उपचार व सोयीसुविधा वेळेवर मिळाल्याने जिल्ह्यातील बाधित रुग्णांचा मृत्युदर हा 2.39 टक्क्यांपर्यंत खाली आला असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक तथा नोडल अधिकारी कोविड-19 डॉ. एन. एस. चव्हाण यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.
जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या कमी होत असली तरी नागरीकांनी बेसावध न राहता शासनाच्या नियमांचे पालन करावे. मास्क हीच कोरोनाची लस आहे असे गृहीत धरुन घराबाहेर पडताना नेहमी मास्कचा वापर करावा, गर्दीच्या ठिकाणी जाण्याचे टाळावे, सामाजिक अंतर राखावे, हात साबणाने स्वच्छ धुवावे, सॅनेटायझरचा वापर करावा. कोरोना सदृश्य लक्षणे जाणवताच तपासणी करुन घ्यावी. असे आवाहन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले आहे.