जळगाव (प्रतिनिधी) मुसळधार पावसामुळे आलेल्या पुरात जळगाव जिल्ह्यात वेगवेगळ्या घटनांत चार जण वाहून गेले. यामध्ये एका विद्यार्थिनीचा समावेश आहे. तसेच दोधे (ता. रावेर) गावात वीज कोसळून पाच जण जखमी झाले.
शहापूर (ता. जामनेर) येथील मोहन पंडित सूर्यवंशी (वय ४०) खडकी नदीच्या पुरात वाहून गेले. आपत्कालीन बचाव पथकासह ग्रामस्थांनी त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला, मात्र रात्री उशिरापर्यंत ते मिळून आले नाही. खादगाव (ता. जामनेर) येथून जामनेर येथे ललवाणी शाळेजवळील बसस्टॉपवर उतरून क्लाससाठी जाणाऱ्या १८ वर्षीय विद्यार्थिनीचा पुलावरून तोल गेल्याने ती कांग नदीपात्रात वाहून गेली. पूनम ज्ञानेश्वर बाविस्कर असे या मुलीचे नाव आहे. तिचा मृतदेह खादगाव जवळील नदीपात्रात काटेरी झुडपांत आढळून आला. मंदुखेडा (ता. जामनेर) येथील केदार पावरा (वय २०) हा तरुण सूर नदीला आलेल्या पुराच्या पाण्यात पाय घसरून पडल्याने वाहून गेला. मलकापूर तालुक्यात हरणखेड येथे सकाळी गोपाल प्रभाकर वांगेकर (वय २८) हा तरुण बैल धुण्यासाठी नदीत उतरला असता बैलासह वाहून गेला. त्याचा मृतदेह नदीतील झुडपांमध्ये एनडीआरएफच्या पथकाने सायंकाळी उशिरा शोधून काढला.