जळगाव (प्रतिनिधी) सराफा बाजारातील एका शोरुममध्ये कामाला असलेली महिला घरी जात असताताना दुचाकीने मागून आलेल्या चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील मंगलपोत लांबवल्याची घटना बुधवारी रात्री बोहरा गल्लीत घडली. ही माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.
शहरातील सराफ बाजारातील एका सोन्याच्या शो रुमध्ये महिला कामाला आहे. ड्युटी संपल्यावर ही महिला बुधवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास घरी जाण्यासाठी पायी निघाली. तेवढ्यात बोहरा गल्लीतील रस्त्याने जाताना मागून दुचाकीवर आलेल्या चोरट्यांनी महिलेच्या गळ्यातील मंगलपोत हिसकावून पळ काढला. महिलेने आरडाओरड केली, परंतु तोपर्यंत चोरटे पसार झाले होते. या घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित, शनिपेठ पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक विशाल जैस्वाल यांच्यासह गुन्हे शोध पथकातील कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले होते.