जळगाव (प्रतिनिधी) शहरातील न्यू स्टेट बँक कॉलनी परिसरातील भाड्याच्या घरात सुरू असलेल्या कुंटणखान्यावर रामानंद नगर पोलिसांनी छापा टाकून दाम्पत्यासह तीन जणांना ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी या ठिकाणाहून पैशांसह काही साहित्य जप्त केले असून, संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रामानंद नगर पोलिस ठाण्याचे निरीक्षक राजेंद्र गुंजाळ यांना भाड्याच्या घरात देहविक्रीचा व्यवसाय सुरू असल्याची गुप्त माहिती मिळाली. त्यांनी पोउनि सचिन रणशेवरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ सुधाकर अंभोरे, जितेंद्र राजपूत, जितेंद्र राठोड, सुशील चौधरी, मनोज सुरवाडे, विनोद सूर्यवंशी, रेवानंद साळुंखे आणि योगेश बारी यांच्या पथकाला कारवाईसाठी पाठवले.
डमी ग्राहकाला घरात देहविक्रीचा व्यवसाय सुरू असल्याची खात्री झाल्यानंतर त्याने मिसकॉलद्वारे पथकाला इशारा दिला. त्यानुसार दोन मजली इमारतीवर छापा टाकण्यात आला. यावेळी घरमालक दिनेश संजय चौधरी व त्यांची पत्नी यमुना राकेश प्रजापती (भारती दिनेश चौधरी) यांच्यासह तीन तरुणांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
तपासात उघड झाले की, हे दाम्पत्य पश्चिम बंगालमधील एका तरुणीला जास्त पैशांचे अमिष दाखवून तिच्याकडून देहविक्री करून घेत होते. या प्रकरणी आरोपी दाम्पत्यासह सर्वांविरुद्ध रामानंद नगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आला असून पुढील तपास रामानंदनगर पोलीस करीत आहे.