भुसावळ (प्रतिनिधी) शहरातील बँक ऑफ महाराष्ट्रमधून खात्यातून पैसे काढून बाहेर पडणाऱ्या निवृत्त कर्मचाऱ्याचे एक लाख रुपये दोन तृतीयपंथींनी धक्काबुक्की करत पिशवीतून अलगद रक्कम लांबवली. हि घटना सोमवारी दुपारी अवघ्या दोन मिनिटात घडली. याप्रकरणी रात्री बाजारपेठ पोलिसांत गुन्हा दाखल झाला.
या संदर्भात अधिक असे की, वसंत प्रल्हाद लढे (मूळ रा. तळवेल ता. भुसावळ, ह. मु. जळगाव) हे निवृत्त कर्मचारी सोमवारी दुपारी भुसावळ शहरातील बैंक ऑफ महाराष्ट्रामध्ये गेले होते. त्यांनी खात्यातून एक लाख रुपये काढले. हे पैसे पिशवीत ठेवून ते घरी जाण्यासाठी निघाले. याचवेळी दोन तृतीयपंथींनी त्यांच्या पिशवीतील पैसे लंपास केले. हा प्रकार लक्षात येताच वसंत लढे यांनी बाजारपेठ पोलिस ठाणे गाठून निरीक्षक राहुल गायकवाड यांची भेट घेतली. त्यांनी बँकेत घडलेला सर्व प्रसंग कथन केला. यानंतर लढे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयित दोन्ही तृतीयपंथी बँकेत तीन मिनिटांपर्यंत थांबलेले दिसत आहे. ते बँकेत एका बाजूला उभे होत टेहळणी करत असल्याचे कॅमेऱ्यातील फुटेजमध्ये दिसते. हे फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
काही क्षण धक्काबुक्की आणि पैसे गायब !
लढे यांनी खात्यातून पैसे काढल्यानंतर ५०० रुपयांच्या नोटांचे दोन बंडल पिशवीत ठेवले. नंतर ते बँकेतून बाहेर जाण्यास निघाले. या वेळी त्यांच्या मागे व पुढे दोन तृतीयपंथी होते. बँकेच्या दरवाजातून वृद्धाला बाहेर पडताना काही क्षण त्यांना धक्काबुक्की सारखा प्रकार झाला. या गोंधळात दोन तृतीयपंथींनी लढे यांनी पिशवीत ठेवलेली एक लाखाची रक्कम लांबवली.
माहिती देणान्यास मिळणार बक्षीस
गुन्हा दाखल होताच पोलिसांनी संशयितांचा शोध सुरू केला आहे. तसेच दोघांची माहिती देणाऱ्यांना योग्य ते बक्षीस दिले जाईल. नाव गोपनीय ठेवण्यात येईल, असे आवाहन भुसावळच्या बाजारपेठ पोलिस ठाण्याचे निरीक्षक राहुल गायकवाड यांनी केले आहे.