नाशिक (वृत्तसंस्था) महाविकास आघाडीत एकत्र असताना शिवसेना आमदाराकडून आपल्यावर होणारे वैयक्तिक आरोप योग्य नसल्याचा पलटवार नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केला आहे. कांदे यांना आपण सहकार्य करणार असून हा कलगीतुरा थांबला पाहिजे, माझ्या दृष्टीने वाद संपल्यात जमा असल्याचं विधान भुजबळांनी केलं.
नांदगावचे शिवसेनेचे आमदार सुहास कांदे यांनी याआधी त्यांच्या मतदारसंघाला पालकमंत्री भुजबळ यांनी पुरेसा जिल्हा नियोजन निधी दिला नसल्याचा आरोप केला होता. आज पत्रकार परिषद घेत नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री हे पद छगन भुजबळ यांच्याकडून काढून घ्यावे अशी मागणी कांदे यांनी केली आहे. तसंच भुजबळ हे हजारो कोटींचे मालक कसे झाले असा प्रश्न त्यांनी पत्रकार परिषदमध्ये उपस्थित केला. भुजबळ हे भाई युनिव्हर्सिटीचे विद्यार्थी नाहीत तर प्राचार्य आहेत असा घणाघाती हल्ला सुहास कांदे यांनी भुजबळांवर चढवला. भुजबळांच्या भ्रष्टाचाराचे पुरावे माझ्याकडे आहेत. हे पुरावे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी दिले आहेत असा दावाही सुहास कांदे यांनी पत्रकार परिषदमध्ये केला.
तर जो काही निर्णय घ्यायचा आहे तो मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री घेतील. हा कलगीतुरा थांबला पाहिजे, माझ्या दृष्टीने वाद संपला आहे असं सांगत नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी या वादावर अधिक बोलण्याचे टाळले. नांदगावला निधी कमी मिळाला ही वस्तुस्थिती नाही असंही भुजबळ यांनी स्पष्ट केलं. घरातलं भांडण चव्हाट्यावर आणायचं कारण नाही असं सांगत या विषयावर जास्त बोलणे छगन भुजबळ यांनी टाळले.