नागपूर (वृत्तसंस्था) एका प्रवाशाला रिक्षाचं भाडं मागणं संबंधित रिक्षा चालकाच्या जीवावर बेतलं आहे. रिक्षा भाड्याचे २०० रुपये मागितल्याने संबंधित प्रवाशानं रिक्षा चालकाच्या डोक्यात दगड घालून त्याची निर्घृण हत्या केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीस अटक केली असून पुढील तपास केला जात आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अनंतराम रजत हा आपल्या पत्नीसोबत खरबी येथून रिक्षाने हुडकेश्वर आऊटर रिंगरोड येथील टाईल्स कंपनीत जात होता. या प्रवासाचं भाडं २०० रुपये झालं होतं. गंतव्य स्थानावर पोहचल्यानंतर रिक्षा चालकाने प्रवासी अनंतराम रजत यांच्याकडे प्रवासाच्या भाड्याची मागणी केली. पण अनंतरामकडे काहीचं पैसे नव्हते. यानंतर रिक्षा चालक आणि अनंतराम यांच्यात वाद झाला. दोघांनी एकमेकांना शिवीगाळही केली. त्यानंतर या हा वाद वाढत गेला.
पोलिसांकडून अटक
त्यामुळे संतापलेल्या आरोपी अनंतरामने रिक्षा चालकाच्या डोक्यात दगड घालून त्याची हत्या केली. त्यानंतर अनंतराम रजतने घटनास्थळावरून पळ काढला. त्यानंतर तेथील काही लोकांनी या हत्येची माहिती नागपूरच्या हुडकेश्वर पोलिसांना दिली. घटनेची माहिती मिळताच, पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. याप्रकरणी हुडकेश्वर पोलिसांनी काही तासातचं सीसीटीव्ही फुटेच्या आधारे आरोपीचा शोध घेतला असून त्याला घटनास्थळापासून काही अंतरावर असलेल्या पेट्रोल पंपावरून अटक केली आहे.