नाशिक (वृत्तसंस्था) शहरातील दोन पोलीस कर्मचारी आणि अधिकारी लाच घेताना पकडले गेले आहे. आडगाव पोलिस ठाण्यात कार्यरत असलेले कॉन्स्टेबल राजेश थेटे यांना 20 हजारांची लाच मागताना पकडण्यात आले आहे. हे प्रकरण उघड होताच पोलीस आयुक्त जयंत नाईकनवरे यांनी तातडीने या गैरप्रकाराची दखल घेत वरिष्ठ पोलीस निरीक्षक इरफान शेख यांची बदली करण्यात आली आहे.
या लाच प्रकरणाला चोवीस तास उलटत नाही तोच भद्रकाली पोलीस ठाण्यात कार्यरत असणाऱ्या सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रणिता पवार या अधिकारी आणि पोलीस नाईक तुषार बैरागी हे दोघेही 20 हजारांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकले आहे. एकीकडे गृह विभाग ‘खाकीची प्रतिमा’ सुधारण्यासाठी प्रयत्नशील असताना दुसरीकडे शहर पोलीस दलातील कर्मचारी, अधिकारी खाकीला काळिमा फासणारी कृत्ये करत असल्याची बाब उघड झाली आहे. भद्रकाली पोलीस ठाण्यात एकाचवेळी अधिकारी, कर्मचारी लाच घेताना पकडले गेले असल्याने आडगावचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक इरफान शेख यांची काल बदली करण्यात आली आहे.