जळगाव (प्रतिनिधी) बँक संगणक प्रणालीमधील नविन अत्याधुनिक सॉफ्टवेअरमध्ये जिल्हा मध्यवर्ती बँक दिनांक 19 जानेवारी 2023 पासून प्रवेश (Migrate) करणार आहे. दिनांक 13, 16 आणि 18 जानेवारी रोजी दिवशी महाराष्ट्रातील शाखेतील सर्व व्यवहार पुर्णत: व शाखा बंद राहतील, असा मॅसेज सोशल मीडियात व्हायरल होत आहे. परंतू हा मॅसेज चुकीचा असल्याचा खुलासा जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील सूत्रांनी केला आहे.
सोशल मीडियात व्हायरल होणाऱ्या मॅसेजमध्ये 13 जानेवारी ते 18 जानेवारीपर्यंत बँकेचे (CASH/ATM/POS/CTS/ECS Clearing, RTGS/NEFT, DBTL, Nach, etc.) तसेच सर्व ऑनलाईन व्यवहारही पूर्ण बंद राहतील. यामुळे बॅक ग्राहकांनी दिनांक 12 जानेवारी 2023 पर्यंत आपले महत्वाचे आर्थिक व्यवहार पूर्ण करून घ्यावेत. जेणे करून आपणास आर्थिक अडचणी येणार नाहीत ही नम्र विनंती. तसेच बँकेचे सर्व व्यवहार दिनांक 19 जानेवारी पासून सर्व व्यवहार पूर्ववत सुरू होतील. या बाबींची बँकेच्या सर्व खातेदारांनी कृपया नोंद घ्यावी. आपणास होणाऱ्या गैरसोयी बद्दल आपण सतर्क रहावे, असेही मॅसेजमध्ये म्हटले आहे. दरम्यान, या मॅसेजमध्ये नेमकी कोणती जिल्हा सहकारी बँकेचे व्यवहार बंद राहणार आहेत, त्या जिल्ह्याचं नेमका उल्लेख नसल्यामुळे अधिकच गोंधळ उडालेला होता. याबाबत जळगाव जिल्हा बँकेतील सूत्रांशी संपर्क साधला असता, त्यांनी हा पूर्ण चुकीचा संदेश असल्याची माहिती दिली आहे.