पुणे (वृत्तसंस्था) किरकोळ वादातून कोंढवा भागातील एका सोसायटीच्या चिटणीसासह मुलाने जादूटोण्याचा प्रकार केल्याचा प्रकार शनिवारी (दि. ८) उघडकीस आला. याप्रकरणी सोसायटीचे चिटणीस राजकुमार जोशी आणि त्यांचा मुलगा अंकुर जोशी (रा. पिकासो पॅराडाइज अपार्टमेंट, कोंढवा) यांच्याविरुद्ध कोंढवा पोलीस स्टेशनमध्ये जादूटोणा प्रतिबंध कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत रूपेश अग्रवाल यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदवली आहे. अग्रवाल आणि त्यांचे वडील १४ मार्च रोजी सोसायटीतून चालले होते. त्या वेळी सोसायटीतील रखवालदार जागेवर नव्हता. अग्रवाल सोसायटीचे चिटणीस राजकुमार जोशी यांच्याकडे गेले. तेव्हा रखवालदाराला गाडी धुण्यासाठी पाठविले असल्याचे जोशी यांनी सांगितले. सोसायटीतील रखवालदाराला वैयक्तिक काम का सांगता ? अशी विचारणा अग्रवाल यांनी त्यांच्याकडे केली. त्यातून त्यांच्यात वादावादी झाली. त्या वेळी जोशी यांनी अग्रवाल पिता-पुत्रांना शिवीगाळ केली.
या प्रकाराबाबत अग्रवाल यांच्याविरुद्ध जोशी यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. त्यानंतर जोशी यांनी त्रास देण्यासाठी सोसायटीच्या प्रवेशद्वार लिंबू ठेवले. काळी बाहुली जाळून अग्रवाल यांना धमकावले. जोशी यांनी अघोरी कृत्य केल्याने अग्रवाल कुटुंबीय घाबरले. रूपेश यांचा मोठा भाऊ राकेश आणि मामा किशनचंद अग्रवाल यांचा जोशी यांनी पाठलाग करून दहशत निर्माण केली. जोशी यांच्या त्रासामुळे राकेश यांना हृदयविकाराचा झटका आला, असे रूपेश यांनी फिर्यादीत म्हटले आहे.